अकोला: राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत रविवारी शहरातील खासगी रुग्णालयात तिरळेपणा असलेल्या नऊ बाल रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.गत वर्षभरात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये विशेष स्वास्थ कार्यक्रम घेण्यात आले. या अंतर्गत विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना डोळ््यांची समस्या आहे, अशा विद्यार्थ्यांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत यातील नऊ विद्यार्थ्यांची शस्त्रक्रियापूर्व तपासणी करण्यात आली. या विद्यार्थ्यांवर रविवार २४ मार्च रोजी डॉ. लाहोळे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे कर्मचारी उपस्थित होते.हृदयविकाराच्या रुग्णांवर अमरावती येथे शस्त्रक्रियाराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदय विकाराच्या सात बाल रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या बाल रुग्णांना मंगळवार २६ मार्च रोजी शस्त्रक्रियेसाठी अमरावती येथे पाठविण्यात येईल. शस्त्रक्रियेपूर्वी त्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाईल.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत रविवारी नऊ विद्यार्थ्यांवर तिरळेपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. यासोबतच हृदयविकाराच्या रुग्णांवरदेखील शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला