कोरोनाचे गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारानंतर म्युकरमायकोसिसची लागण झाल्याने अनेकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू लागले. सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत १२५ रुग्ण दाखल झाले असून, त्यापैकी ५० पेक्षा जास्त रुग्णांच्या जबड्याच्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. सर्वोपचार रुग्णालयात दररोज सरासरी तीन ते चार रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. हेच प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्यातही असून, अनेकांना डोळेदेखील गमवावे लागले; मात्र अकोल्यात रुग्णांमध्ये वेळीच म्युकरमायकोसिसचे निदान झाल्याने रुग्णांवर वेळेत उपचारास सुरुवात झाली. डोळ्यातील इंजेक्शनचे तिन्ही डोस वेळत देण्यात आल्याने ५० रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे सहा रुग्णांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी रुग्णांनी न घाबरता वेळीच चाचण्या करून निदान करा व उपचारास सुरुवात करा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले.
१२५ रुग्ण, त्यापैकी ८४ उपचार घेत आहेत. ६ मृत्यू
औषधांचा तुटवडा
म्युकरमायकोसिससाठी आवश्यक औषधांचा तुटवडा कायम आहे. जिल्ह्यात रुग्णांच्या तुलनेत औषधांची मागणी करूनही गरजेनुसार पुरवठा केला जात नाही. इंजेक्शनच्या एका व्हायलमध्ये सुमारे १० ते १५ रुग्णांना इंजेक्शन दिले जाते.
प्राथमिक लक्षणे
म्युकरमायकोसिसची सुरुवात नाकातून होते.
सर्दी किंवा नाकातून नेहमीच पाण्याचा स्त्राव होणे.
कधी कधी नाकातून रक्त येणे.
अर्ध डोकेदुखी तसेच चेहऱ्यावर सूज येणे.
डोळ्यात लागण झाल्यास डोळ्यांना सूज येणे तसेच नजर कमी होणे.
ही घ्या काळजी
कोविडमधून बरे होताच नाकाची आणि डोळ्यांची चाचणी करून घ्यावी.
विशेषत: जे रुग्ण अनेक दिवस ऑक्सिजनवर असलेले रुग्ण, स्टेरॉइड दिले गेले आहेत, असे रुग्ण
प्रामुख्याने मधुमेहाच्या रुग्णांनी म्युकरमायकोसिसची चाचणी करून घ्यावी.
कोविडच्या गंभीर रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यांतर तत्काळ नाकाची आणि डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. जेणेकरून म्युकरमायकोसिस आजाराची लागण झाल्याचे लवकर निदर्शनास येईल. वेळेत उपचार झाल्यास शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकाही म्युकरमायकोसिसच्या रुग्णाचा डोळा काढावा लागला नाही.
- डॉ.भावेश गुरुदासानी, नेत्ररोग तज्ज्ञ, जीएमसी, अकोला