शिंगोली, दुधाळा, मंडाळा, निमकर्दा, खंडाळा, कंचनपूर, मांजरी, मालवाडा, हातरुण परिसरात आतापर्यंत पेरणीयोग्य दमदार पाऊस झाला नाही. या भागातील शेती कोरडवाहू असून पाऊसच पिकांसाठी महत्त्वाचा आहे. मात्र पाऊस हुलकावणी देत असल्याने अजूनपर्यंत शेतात पेरणी करता आली नाही. शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. यावर्षी अजूनही दमदार पाऊस न झाल्याने पेरणी कधी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कर्ज काढून, पैशाची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी खते - बियाणे खरेदी केले. शेतीची मशागत केली. मात्र पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पेरण्या केलेल्या शेतातील कोवळ्या अंकुराला कडक उन्हाचा तडाखा बसत असल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. दुबार पेरणीसाठी पैसे आणावे कोठून असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
दमदार पाऊस न झाल्याने नाले कोरडे पडले आहेत. हातरुण येथील मोर्णा नदीचे पाणी आटण्याच्या मार्गावर आहे. पाऊस नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून जनावरांना जगवावे कसे असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.
काळ्या ढगांनी आभाळ भरून येते. जोरदार पाऊस होईल असे वातावरण तयार होत असताना अचानक ढग निघून जातात. पाऊस येत नाही. कडक उन्हाचा तडाखा बसतो आणि पाऊस हुलकावणी देतो. निसर्गाचा लहरीपणा, पिकांवरील रोगराई, हवामान बदलामुळे शेती शेतकऱ्यांसाठी तोट्याची ठरत आहे. दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम आहे.
फोटो:
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नाही. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपण्याच्या मार्गावर असताना पाऊस नाही. त्यामुळे पेरणी थांबली आहे. जगाच्या पोशिंद्यावर आज आलेले संकट फार मोठे आहे.
- मुकेश गव्हाणकर, शेतकरी.
अंकुरलेल्या पिकाला उन्हाचा तडाखा बसत आहे. पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ आली आहे. दुबार पेरणीसाठी पैसा कोठून आणायचा हा प्रश्न असून शासनाने मदत करावी.
- राजेश काळे, शेतकरी, दुधाळा.