- सचिन राऊत
अकोला : कपल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज, सिंगल चॅलेंज, खाकी चॅलेंज असे वेगवेगळे चॅलेंज स्वीकारून स्वत:चे व आपल्या कुटुंबीयांचे फोटो फेसबुकवर अपलोड करीत असाल, तर सावधान!तुम्ही स्वत: अपलोड केलेल्या या फोटोचा सायबर गुन्हेगार गैरवापर करून तुमच्या सुखी संसारात आग लावत असल्याच्या घटना घडल्या असून, आता या ट्रेंडला बळी पडणाऱ्यांचे धोके वाढले आहेत. त्यामुळे कोणीही याच्या लेनच्या नादात कुटुंबातील महिलांचे फोटो फेसबुक किंवा तत्सम सोशल माध्यमांवर अपलोड करून विनाकारणच घराची इज्जत घालवू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. चॅलेंजचा असा आहे ट्रेंडफेसबुकवर वेगवेगळ्या चॅलेंजच्या नावाखाली स्वत:चे व परिवाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याला बळी पडून अनेक जण पत्नीसोबतचे फोटो अपलोड करीत आहेत. कुणी नववारीत तर कुणी सूटमध्ये, कुणी पारंपरिक तर कुणी पाश्चात्त्य पेहराव परिधान करून हा चालेंज स्वीकारण्याच्या नादात अनेक जण धोक्याला परवानगी देत आहेत. असा होईल धोकाकपल चॅलेंज नावाने फेसबुकवर सर्च केले असता हजारो दाम्पत्यांचे फोटो त्यांना सहज उपलब्ध होत आहे. विकृत गुन्हेगार एका महिलेच्या ठिकाणी दुसºया महिलांचे मार्फ (एडिट) करून ते अश्लील छायाचित्र नातेवाइकांना किंवा मित्र परिवारांना पाठवून संबंधित महिलेचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. तिला ब्लॅकमेल केले जाऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध होणाचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांकडे तक्रार कराअशा प्रकारचे अनेक गैरप्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होऊन अशा कोणत्याही चॅलेंजच्या नादात आपले अथवा पत्नीचे, मुलींचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करू नये, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. ज्यांनी फोटो अपलोड केले आणि कुणाला सायबर गुन्हेगार ब्लॅकमेल करत असेल तर त्यांनी लगेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. खाकीची धडकफेसबुकवर सुरू झालेल्या या ट्रेंड वर खाकीनेही उडी घेतली आहे. अनेक पोलिसांनी समूहा(ग्रुप)ने आपले खाकीतील फोटो शेअर केले आहे. खाकीचे हे कडक फोटो कमालीचे भाव खाऊन जात आहे.