अकोला : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय)वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा द्या, अन्यथा आयटीआय प्रवेशद्वाराला कुलूप लावणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने (मनविसे) देण्यात आला. बुधवारी वसतिगृहातील समस्यांबाबत मनसेच्यावतीने आयटीआय परिसरात घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा करण्यात आली आहे. यंदा वसतिगृहाच्या शुल्कातही शासनाने वाढ केली आहे. परंतु, त्या मोबदल्यात विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येत नाहीत. संस्थेच्या वसतिगृहातील शौचालयाची दयनीय अवस्था झाली असून, सर्वत्र अस्वच्छ वातावरण पसरले आहे. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आणि शौचासाठी एकाच टाकीतील पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. वसतिगृहाची स्वच्छतादेखील नियमित करण्यात येत नाही. वसतिगृह शुल्क अदा करूनही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांंना न्याय मिळावा, या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेच्यावतीने बुधवारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आंदोलन करण्यात आले. यावेळी सेनेच्या पदाधिकार्यांनी विद्यार्थ्यांसोबतच चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वसतिगृहातील समस्यांबाबत विद्यार्थी सेनेच्यावतीने आयटीआय प्राचार्यांंना निवेदन देण्यात आले. तसेच १0 आक्टोबरपर्यंंत वसतिगृहातील विद्यार्थ्यांंना मूलभूत सुविधा न पुरविल्यास आयटीआयच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्याचा इशारादेखील देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे भूषण भिरड, महानगर उपाध्यक्ष गोपाल मुदगल, शुभम भिरड, आकाश भिरड, सागर भिरड, हरीश वाघमारे, अक्षय नागलकर, ज्ञानेश्वर शेंडे, तुषार गावंडे, प्रशांत झाडे, विनोद घुसे आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना सुविधा द्या, अन्यथा कुलूप ठोकणार!
By admin | Published: October 01, 2015 1:46 AM