लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकरी तसेच शासनाची सेवा करून सेवानवृत्त झालेले, मुले जवळ राहत नसल्याने कुणाचाही आधार नसल्यामुळे एकटेच जीवन जगत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आता खदान पोलिसांनी आधार देण्याचा एक आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. पोलिसांच्या सुविधा या ज्येष्ठ नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करण्याचा हा अनोखा उपक्रम खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांनी सुरू केला आहे.खदान पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांची एक बैठक घेतली असून, यामध्ये पोलिसांनी त्यांना त्यांच्या कोणत्याही समस्या असतील, तर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले बाहेरगावी तसेच परदेशात आहेत, त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांना आधार नसल्याने त्यांना पोलिसांच्या विविध सुविधा देण्यासोबतच शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी खदान पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. शासनाने केलेल्या कायद्यानुसार खदान पोलिसांनी त्यापुढे जाऊन ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून विविध उपक्रम सुरू केले आहेत.
असा राहील व्हॉट्स अँप ग्रुपज्या ज्येष्ठ नागरिकांकडे स्मार्ट फोन आहे, त्यांचे ज्येष्ठ नागरिक संघाचे पोलीस अधिकार्यांचा सहभाग असलेले वेगवेगळय़ा संघाचे व्हॉट्सअँप ग्रुप तयार करण्यात येईल. यामध्ये स्वत: ठाणेदार गजानन शेळके, पीएसआय शशिकिरण नावकार, किशोर आठवले व प्रसाद सोगासने हे राहतील, या ग्रुपच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती, ज्येष्ठ नागरिकांना असलेल्या समस्या, त्यांच्या तक्रारी व दैनंदिन अडचणी काय आहेत, यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे आणि या ग्रुपच्या माहितीच्या आधारे चर्चा करून सोडविण्यात येणार आहेत.
या सुविधा देणार घरपोच!ज्येष्ठ नागरिकांना पोलीस ठाण्यात न बोलाविता त्यांना पासपोर्ट व्हेरिफिकेशन, चारित्र्य पडताळणी, त्यांच्याविरोधात आलेल्या कौटुंबिक तक्रारी सोडविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ठाण्यात न बोलाविता त्यांच्या ठिकाणी खदान पोलिसांनी गठित केलेले एक विशेष पथक जाणार आहे आणि त्यांच्या समस्या घरपोच सोडविण्यात येणार आहेत.
असा राहील उपक्रम!पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या मार्गदर्शनात समाजाभिमुख पोलिसिंग हा नवीन उपक्रम खदानचे ठाणेदार गजानन शेळके राबविणार आहेत. जिल्हय़ातील २३ पोलीस ठाण्यांपैकी केवळ खदान पोलीस ठाण्यात हा उपक्रम सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना चांगलाच आधार मिळणार आहे.
तक्रारी सोडविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून खदान पोलिसांनी एक स्वतंत्र पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचे पथकच कार्यान्वित केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना शासकीय कार्यालय, बँक किंवा अन्य ठिकाणी त्रास होत असल्यास हे पथक संबंधित ठिकाणावर दाखल होऊन त्यांच्या समस्या सोडविणार असल्याची माहिती ठाणेदार गजानन शेळके यांनी दिली.
खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांना पोलीस विविध सुविधा पुरविणार आहेत. यासाठी या हद्दीतील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकार्यांनी एकदा खदान पोलिसांशी संपर्क साधावा, त्यानंतर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा आधार बनण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.- गजानन शेळके,ठाणेदार, खदान पोलीस स्टेशन.