अकोला, दि. १0 : कोणताही परवाना नसताना अकोल्यातील एमआयडीसी मध्ये रासायनिक खते व पीक वाढ संजिवके तयार करण्याचे दोन कारखाने तीन वर्षांपासून सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. तीन वर्षांपासून विना परवाना खते व संजिवके तयार करुन विक्री केली जात असताना, यासंदर्भात कृषी विभागामार्फत आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे याबाबत कृषी विभाग अनभिज्ञ होता काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस आणि कृषी विभागाने ह्यएमआयडीसीह्णमधील दोन गोदामांवर टाकलेल्या धाडीत विना परवाना रासायनिक खते व पीक संजिवके तयार करून विक्री करण्याचा गोरखधंदा चव्हाट्यावर आला. गोदामातून विना परवाना लाखो रुपयांचा साठा ह्यसीलह्ण केल्यानंतर यासंदर्भात कृषी विभागाच्या जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकांनी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस आणि कृषी विभागाने अकोल्यातील एमआयडीसी क्र.३ व ४ मधील एस.आर.पी.प्रोडक्ट्सच्या दोन गोदामांवर मंगळवारी धाड टाकली. त्यामध्ये एमआयडीसी क्र.३ मधील गजानन सखाराम पाचंगे व एमआयडीसी क्र.४ मधील रमेश सखाराम पाचंगे यांच्या मालकीच्या गोदामात विना परवाना रासानिक खते व पीक वाढीसाठी पीक संजिवके तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आले. दोन्ही कारखान्यांच्या तपासणीत कृषी विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना, प्रयोगशाळा तपासणीचे प्रमाणपत्र व आवश्यक असलेली कागदपत्रे नसताना रासायनिक खते तयार करून विक्री करण्यात येत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे तपासणी दरम्यान, ५१८ किलो खतसाठा आणि एक हजार लिटर पीक संजिवके असा एकूण १0 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा साठा दोन्ही कारखान्यातून जप्त करून मोहोरबंद करण्यात आला तसेच दोन्ही कारखान्यांच्या गोदामांना ह्यसीलह्ण करण्याची कारवाई करण्यात आली. मोहोरबंद केलेला खत व पीक संजिवकांचा साठा संबंधित कारखान्यांच्या मालकांना सुपूर्दनाम्यावर सोपविण्यात आला. त्यानंतर विना परवाना रासायनिक खते व पीक संजिवके तयार करून विक्री करण्याच्या या प्रकारासंदर्भात बुधवारी सायंकाळी कृषी विभागाचे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक मिलिंद जंजाळ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यासंदर्भात पोलीसांकडून काय कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.
तीन वर्षांपासून सुरु होता कारखाना!
By admin | Published: August 11, 2016 1:50 AM