अकोला : आकोट फैलमधील आकोट रोडवर भारतीय खाद्य निगमच्या गोदामाजवळ भरधाव ट्रक निंबाच्या झाडावर आदळल्याची घटना सोमवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकमधील दोघे जागेवरच ठार झाले असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, ट्रकचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोहोट्टाबाजार येथील रहिवासी प्रकाश नागोराव खेडकर यांच्या मालकीचा एम एच ३0 एबी २३0७ क्रमांकाचा ट्रक विटा घेऊन सोमवारी रात्री अकोल्यात आला होता. वीट खाली केल्यानंतर ट्रकचालक राजेश दामोदार हा ट्रक घेऊन चोहोट्टा बाजाराकडे रात्रीच्यावेळी भरधाव वेगात जात असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक निंबाच्या झाडावर आदळला. त्यामुळे ट्रकमध्ये क्लीनर साईडने बसून असलेले शरद खोडके आणि नागेश राठोड या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर रफीक शहा, पंढरी मुकुंदे आणि विनोद वढाळ हे तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी प्रकाश खेडकर यांनी आकोट फैल पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रकचालक दामोदर याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, ३३७, ३0४ अ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. या अपघातामध्ये ट्रकचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच आकोट फैल पोलीस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात पाठविला असून, जखमींना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयामध्ये पाठविले.
भरधाव ट्रक झाडावर आदळला; दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2016 2:07 AM