अकोला: शहरातील लिबर्टी इन्स्टिट्युट आॅफ प्रोसेशन स्टडीज या संस्थेमार्फत डी-फार्ममध्ये प्रवेश व राजीव गांधी विद्यापीठ आॅफ हेल्थ सायन्स कर्नाटकचे डिप्लोमा इन फार्मासिस्टचे प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या भूलथापा देऊन विद्यार्थ्याची १ लाख ४० हजार रुपयांनी फसवणूक केल्या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी प्रा. रोहन राजे व रोहिनी राजे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.निमवाडी परिसरात राहणारा दिनेश किशोर रायसिंग (२९) याच्या तक्रारीनुसार राऊतवाडी परिसरातील भाग्योदय बिल्डिंगमधील लिबर्टी इन्स्टिट्युट आॅफ प्रोसेशन स्टडीज व संस्थेमार्फत डी-फार्ममध्ये प्रवेश मिळवून देतो व राजीव गांधी विद्यापीठ आॅफ हेल्थ सायन्स कर्नाटकचे डिप्लोमा इन फार्मासिस्टचे प्रमाणपत्र मिळवून देतो, अशा भूलथापा देऊन प्रा. रोहन रवींद्र राजे (३४), रोहिनी रवींद्र राजे (५२, रा. सत्संग अपार्टमेंट) यांनी पैसे उकळले. प्रमाणपत्र व डी-फार्मला प्रवेश देण्यासाठी इन्स्टिट्युटमध्ये दोन परीक्षा द्याव्या लागतील आणि डिप्लोमा अधिकृत असेल अशा भूलथापा प्रा. रोहन राजे याने देत, दिनेश रायसिंग याच्याकडून दोन वर्षांसाठी १ लाख ४0 हजार रुपयांची मागणी केली. विद्यार्थ्यानेही विश्वास ठेवून १२ जुलै २०१७ रोजी रोख ७० हजार दिले. नंतर १३ आॅक्टोबर २०१७ रोजी रोख ३० हजार रुपये दिले. त्यानंतर विद्यार्थ्याने चौकशी केली असता, राजीव गांधी विद्यापीठ बंद पडले आहे. हवे तर तुम्हाला मार्कशीट व डिग्री बनवून देतो, असे प्रा. रोहन राजे याने विद्यार्थ्याला सांगितले. त्यानंतर प्राध्यापकाने मार्कशीट देण्यास टाळाटाळ सुरू केली. दिनेश रायसिंग हा १४ नोव्हेंबर २०१७ रोजी नातेवाइकांना घेऊन प्राध्यापकाच्या इन्स्टिट्युटमध्ये गेला असता, त्याला २०१४-१६ या वर्षाच्या आचार्य इन्स्टिट्युटच्या मार्कशीट देऊन वैध असल्याच्या सांगितल्या. त्यानंतर १६ जानेवारी २०१८ रोजी कॉलद्वारे उर्वरित रक्कम भरा, अन्यथा डिग्री मिळणार नाही, असे सांगितले. त्यामुळे रायसिंगने ४० हजार रुपये भरले; मात्र प्राध्यापकाने त्याला डिग्री दिली नाही. पुढे दिनेश रायसिंगला मार्कशीट बनावट असल्याचे माहिती झाले. त्यामुळे दिनेशने प्राध्यापकाला पैसे परत मागितले; परंतु प्रा. राजे याने त्याला पैसे परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर रायसिंगने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार सिव्हिल लाइन पोलिसांनी प्राध्यापक व त्याच्या आईविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६८, ४७१, ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)