यंदा अतिपावसामुळे खरीप हंगामातील डाळवर्गीय पिकांना फटका बसल्याने अनेक पिके वाया गेली. तसेच पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. दर महिन्याच्या किराणा साहित्याच्या यादीतील तूर, उडीद, हरभरा डाळीचे भाव वाढले आहेत. दुसरीकडे बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. दुसरीकडे शहरात थंडीचा जोर वाढल्याने सुक्यामेव्याच्या भावात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या ग्राहक थंडीच्या दिवसात खारीक, खोबरा, काजू, बदाम यांना पसंती देत असल्याचे चित्र आहे.
असे आहेत भाजीपाल्याचे भाव
कांदे ४० ते ४५ रुपये, लसूण १०० ते १२० रुपये, फुलकोबी २० रुपये प्रतिकिलो, वांगी १० ते २० रुपये, मेथी १० ते २० रुपये, पालक २० ते ३० रुपये, दाेडके २० ते ३० रुपये, कोथिंबीर २० रुपये, हिरवी मिरची ३० ते ४० रुपये, कारली ४० ते ५० रुपये, बटाटे २० ते ३० रुपये प्रतिकिलोदराने मिळत आहे.
फळांची मागणी वाढली
भाजीपाल्याच्या भावात घसरण झाली; फळांचे भाव स्थिर असल्याचे चित्र आहे. बाजारात फळांची मागणी वाढली आहे.
खाद्यतेलाचे भाव गगनाला, महिलांची पंचाईत
भाजीपाल्यांचे भाव कमी झाले असले, तरी सध्या सुकामेव्याचे भाव वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. सध्या बाजार खारीक २२० ते ३००, खोबरा २०० ते २५० रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. तसेच खाद्य तेलाचे भावही वाढल्याने महिलांची चांगलीच पंचाईत होत आहे.
स्वयंपाक घरात महत्त्वाचे असलेले खाद्यतेलाचे भाव वाढल्याने बजेटच कोलमडले आहे, सुकामेव्याच्या भावात वाढ झाल्याने पंचाईत झाली आहे.
- गृहिणी, अकोला.
बाजारात भाजीपाल्याची मागणी वाढली, तरी उत्पादनात घट झाल्याने आवक घटली आहे. दर वाढल्याने ग्राहक कमी झाले आहेत. भाजीपाला पूर्ण खपतही नाही.
-भाजीपाला विक्रेता, अकोला.