अकोला : जिल्हा परिषदेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदल्यांतून सोयीची शाळा मिळण्यासाठी अनेकांनी खोटी कागदपत्रे सादर करण्यासोबतच पती-पत्नी एकत्रीकरणासाठी गावांमधील अंतराची माहितीही चुकीची दाखवल्याचे ४० पेक्षाही अधिक प्रकार पुढे आल्याची माहिती आहे. संबंधितांवर आता लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. ग्रामविकास विभागाने २८ जून रोजी त्याबाबत आदेश दिला होता.शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या शासन स्तरावरून आॅनलाइन करण्यात आल्या. त्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत शिक्षकांनीच मोठे घोळ केले. विशेष म्हणजे, अनेक शिक्षकांनी सोयीच्या शाळेवर बदली मिळण्यासाठी आरोग्यविषयक समस्यांची खोटी कागदपत्रे जोडली. त्यातून त्यांना सोयीची शाळा मिळाली. तर काहींनी अंतर, पती-पत्नी एकत्रीकरण, पाल्याचे आजारपण या बाबीही नोंद केल्या. त्याचा फायदा त्यांना मिळाला. त्याचवेळी पात्र शिक्षकांवर अन्याय झाला. त्यामुळे शिक्षकांनी केलेल्या दाव्यातील खरेपणा तपासून त्यांच्यावर कारवाईची मागणी पुढे आली. शासनाने सोयीच्या शाळा मिळवणाऱ्या शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तातडीने पडताळणी करण्याचा आदेश दिला आहे. संवर्ग २ अंतर्गत ३० किमीपेक्षा जास्त अंतर नसलेल्या शिक्षकांची तसेच संवर्ग १ ची कोणतीही तपासणी न करताच पदस्थापना देणे, सेवाज्येष्ठ शिक्षकांनी मागितलेली गावे कनिष्ठ शिक्षकांना देण्यात आली. या संपूर्ण प्रकारांची चौकशी समितीकडून आटोपली. प्राथमिक शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्याकडून उद्या, बुधवारी त्याबाबत कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर होण्याची शक्यता आहे.
सौभाग्यवती झाल्या कुमारिकासंवर्ग एक मध्ये बदलीचा लाभ मिळण्यासाठी काही शिक्षिकांना एकट्याच राहत असून, त्यांनी कुमारिका किंवा परित्यक्ता असल्याचे दाखवले आहे. तर काहींनी घटस्फोटित असल्याचेही नमूद केले. काहींनी आजार, पाल्याचा आजार दाखवला आहे. काही शिक्षक अद्यापही रूजू झाले नाहीत. या सगळ््या बाबींच्या अहवालानुसार कारवाईचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी अवचार सादर करणार आहेत.
वेतनवाढ रोखणार, पुढच्या वर्षी बदली विशेष संवर्ग भाग-१, विशेष संवर्ग भाग-२ नुसार सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी खोट्या कागदपत्रांचा आधार घेणाºयांच्या पडताळणीमध्ये दोषी आढळलेल्या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याची कारवाई केली जाईल.