अकोला.. संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदाेलनाला बदनाम करण्याचे कारस्थान रचले जात आहे. आंदोलकांबद्दल चुकीच्या अफवा काही लोक पसरवून आंदोलनाला गालबोट लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अशा प्रयत्नांमधून हे आंदाेलन थांबणार नाही. तीन काळे कायदे रद्द होईपर्यंत काहीही झाले तरी शेतकरी शांत बसणार नाहीत याची जाणीव या आंदाेलनात प्रत्यक्ष सहभाग घेतल्यावर तसेच आंदाेलकांशी चर्चा केल्यावर झाली आहे, अशी माहिती किसान विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
आंदोलनांला पाठिंबा देण्यासाठी ५ जानेवारीला अकोल्यातून निघालेल्या किसान विकास मंचच्या २०० सदस्यांचे १२ जानेवारी रोजी अकोल्यात आगमन झाले, यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते.
३ दिवस दिल्ली आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा देताना जे अनुभव आम्हाला आलेत ते आयुष्यभर लढण्याची ऊर्जा देत राहतील. किसान विकास मंचचे सदस्य अकोल्यातून निघाल्यावर दि. ७ जानेवारी रोजी सर्वप्रथम ग्वालियर व नंतर दि. ८ जानेवारी रोजी किसान विकास मंच हरियाणा व दिल्ली जवळील पलवल बॉर्डर येथे शेतकरी-महिलांसह पोहोचले, देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून केंद्र सरकारने केलेले तीन काळे कायदे रद्द झालेच पहिजेत, याकरिता पलवल बॉर्डरवर निदर्शने केली. या पलवल सीमेवर शेतकरी आंदोलनाचे नियोजन करणारे जीत सिंग, जगन चौधरी, बलराजसिंग, महेंद्र सिंग चौहान यांची भेट घेऊन आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर चर्चा झाली. दिल्लीतील आंदोलकांबद्दल चुकीच्या अफवा काही लोक पसरवून आंदोलनाला गालबोट लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची त्यांनी जाणीव करून दिली व तीन काळे कायदे रद्द होईपर्यंत काहीही झाले तरी शांत बसणार नाही, असे सर्वानुमते ठरल्याचे सांगितले. ८ जानेवारी रोजी दिल्लीतील सिंधू बॉर्डरवरील मुख्य शेतकरी आंदोलनात अकोल्यातील २०० शेतकऱ्यांसह किसान विकास मंचाने आंदोलनात सहभाग घेऊन आंदोलनांला पाठिबा दर्शविला. यावेळी जथेदर राजा राजसिंग व अर्बन खरबन यांच्या भेटीत माहिती मिळाली की, शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य न केल्यास २६ जानेवारीला या देशातील किसान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील, असेही स्पष्ट करण्यात आले. केंद्र सरकारने तिन्ही काळे कायदे रद्द केले नाहीत तर देशातील अन्य शेतकऱ्यांसह दिल्लीत तिरंगा फडकविण्यासाठी किसान विकास मंच २६ जानेवारी रोजी पुन्हा दिल्लीत जाईल, अशी माहिती दिल्ली आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊन आलेले किसान विकास मंचाचे संयोजक भय्यासाहेब ऊर्फ अविनाश देशमुख, संयोजक विवेक पारस्कर यांनी दिली. यावेळी राजू पाटील, आलमगीर खान, अमोल नळकाडे, सॊ. मनीषा महल्ले, सो. सुनीता धुरंधर, सौ. बबिता लुले, सौ. गीता अहिरे, सौ. स्वाती बोर्डे, सौ. किरण गावंडे, सौ. शारदा घरत, सौ. अर्चना कांबळे आदी उपस्थित होते.