मूर्तिजापूर : तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यानी संघंटीतपणे काम करण्याचे प्रयत्न करावे, कार्य कर्तव्याच्या भावना समजून घेण्यासाठी व बळ देण्यासाठी ही परिवार संवाद यात्रा असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी परिवार संवाद यात्रे निमित्ताने शनिवारी येथे आयोजित बैठकीत केले. गडचिरोली पासून या परिवार संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली असून तब्बल दहाव्या दिवशी मूर्तिजापूर प्रचंड जनसमुदायासमोर बोलताना आपल्याला आनंद होत आहे. कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी जबाबदारी स्वीकारून बुथ, कमिट्या तयार करुन स्थानिक नेत्यांनी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे आवाहन करीत आपण कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी या यात्रे निमित्ताने संवाद साधण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. तद्वतच या तालुक्याच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असून लवकरच त्या मार्गी लावणार असल्याचे सांगितले. या वेळी जिल्ह्याचे संपर्क मंत्री यांनी यात्रेमागची भूमिका विशद करताना, कुठलेही निमित्त नसताना ही संवाद यात्रा का काढावी लागली हे स्पष्ट केले, दरम्यान, कोणाच्याही तोंडाला मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग नसल्याने विदर्भात कोरोना नसल्याची फिरकी घेतली. पक्ष संघटन यादृष्टीने हा परिवार संवाद दौरा असून केंद्र शासनाचा समाचार घेताना केंद्र शासनाने अनेक चुकिचे निर्णय घेतल्याने येथील महिला सुरक्षित नसल्याची खंत उदाहरण देऊन व्यक्त केली. आमच्या पक्षात सक्षम महिला असून त्यांची ओळख त्यांनी स्वकर्तृत्वाने निर्माण केली असल्याच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या. यावेळी रविकांत वरपे, माजी आमदार तुकाराम बिडकर, भैयासाहेब तिडके, बळीराम सिरसकार, हरीदास भदे, रवी राठी, संतोष कोरपे, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आमदार अमोल मिटकरी, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, रक्षणा सलगर, गुलाबराव गावंडे, प्रदेश प्रवक्ता आशा मिरगे, शिवा मोहोड, उज्वला राऊत, सुषमा कावरे इत्यादी उपस्थित होते. संध्याकाळी ५ वाजता नियोजीत कार्यक्रम रात्री ९ वाजता सुरु झाल्याने उपस्थित बार्शीटाकळी व मूर्तिजापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी परिवार संवाद दौरा - जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 3:50 PM