संतोष येलकर/अकोलादुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चारा नसल्याने जनावरे जगविणार कशी, याबाबतची चिंता जिल्ह्यातील शेतकर्यांना सतावत आहे. टंचाईच्या परिस्थितीत जनावरे विकण्याशिवाय पर्याय नाही; मात्र बाजारात भाव मिळत नसल्याने कवडीमोल भावाने ती विकण्याची वेळ शेतकर्यांवर आली.जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. अत्यल्प पावसामुळे नदी-नाले आटले असून, धरणांमध्येही अत्यल्प जलसाठा आहे तसेच नापिकीमुळे चारा उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांत पाणी व चार्याच्या टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असताना, जनावरांना जगविण्यासाठी पाणी आणि चारा कोठून आणणार, असा प्रश्न गावागावांतील शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. जिल्ह्यात लहान व मोठी ३१७१0५ जनावरे आहेत. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या आदींचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चारा उपलब्ध नाही. चार्याचे भाव गगनाला भिडल्याने, जनावरांना जगविणार कसे, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. या पृष्ठभूमीवर जनावरे विकण्याशिवाय शेतकर्यांसमोर पर्याय नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अकोला, सांगळूद, चोहोट्टाबाजार, मूर्तिजापूर, वाडेगाव, सिंदखेड, बाश्रीटाकळी, चान्नी, हातगाव आदी ठिकाणच्या बाजारात विक्रीसाठी येणार्या जनावरांची संख्या वाढली आहे. बाजारात आणलेल्या पशुधनाला दुष्काळी परिस्थितीमुळे मागणी नसल्याने, मिळेल त्या भावात पशुधन विकण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
दुष्काळात जनावरांना कवडीमोल भाव
By admin | Published: April 11, 2016 1:34 AM