अडगाव बु. (अकोला): ‘माझं वावर, माझी पॉवर’, या शेतकरी तंत्रज्ञान स्वतंत्रताकरिता शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा आज अडगावात एचटीबीटी बियाण्याची पेरणी करून प्रयोग यशस्वी केला. शेतकरी संघटनेच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून येथील संघटनेचे युवा आघाडी तालुका अध्यक्ष नीलेश नेमाडे यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या कपाशीचे वाण लागवड करण्याची घोषणा करून एचटीबीटीची लागवड केली आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे, याकरिता शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येऊन लागवड करीत आहेत. शेतकरी तंत्रज्ञान स्वतंत्रताकरिताच संघटनेने हे आंदोलन छेडले असल्याची बाब माहिती तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकार यांनी यावेळी मांडली. एचटीबीटी बियाणे पेरणीला शासनाची मान्यता नसल्याने शासनाने या बाबीची दखल घेतली. संबंधित शेतात कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी, जि. प. डॉ. मुरली इंगळे, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी नितीन लोखंडे, मोहीम अधिकारी मिलिंद जवंजाळ, तालुका कृषी अधिकारी डॉ. मिलिंद वानखडे यांनी हजेरी देऊन उपस्थित शेतकऱ्यांना एचटीबीटी बियाणे पेरू नका, याला शासनाची मान्यता नाही. या बियाण्यांवर बंदी असून हा कायदेभंग असल्याची बाब शेतकरी नीलेश नेमाडे यांच्या निदर्शनास आणून दिली; परंतु कृषी विभागाच्या या म्हणण्याला नेमाडे व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी न जुमानता शेतात एचटीबीटी बियाण्यांची पेरणी करून आपले आंदोलन यशस्वी केले. यावेळी २०१० पासून सरकारने बंद केलेल्या चाचण्यांमुळे शेतकरी या नवीन तंत्रज्ञानापासून वंचित राहिला असून, लवकर यावरील बंदी उठवून शेतकºयांना एचटीबीटी पेरण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा, असा सूर शेतकºयांनी व्यक्त केला. यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित पाटील बाहाळे, माहिती तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकार यांनी उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संघटनेचे सतीश देशमुख, विलास ताथोड, डॉ. नीलेश पाटील, विक्रांत बोंद्रे, किरण कौठकार, आशा नेमाडे, दिनेश देऊळकार, अमोल मसुरकार, जाफरखा व मकसुद मुल्लाजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यता नसलेल्या ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यांची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 3:15 PM