आगर (अकोला) : सततच्या नापीकी व यावर्षी कपाशीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे निराश झालेल्या उगवा येथील एका अल्पभूधारक शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. राजू मधुकर वाघ (४४) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे. येथून जवळच असलेल्या उगवा येथील राजू वाघ यांच्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती असून, गत काही वर्षांपासून ते शेतातून पुरेशा प्रमाणात उत्पन्न मिळत नसल्याने चिंतीत होते. यावर्षीही शेतीवर केलेला खर्च वसूल होत नसल्याची स्थिती पाहून त्यांच्या नैराश्यात भरच पडली. अती पावसामुळे यावर्षी कपाशीचा उतारा कमी आल्यामुळे निराश झालेल्या राजू वाघ यांनी मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांच्या अंगणातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर अकोट फैल पोलिस ठाण्यात वर्दी देण्यात आली. ठाणेदार गणेश अणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी गणेश भांडे अरूण येनकर यांनी उगवा येथे येऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. पोलिसांत याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. राजु वाघ यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
कपाशीचे उत्पादन घटल्यामुळे निराश शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 3:40 PM