लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : म्हैसांग येथील शेतकरी आणि अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडते शशिकांत मानकर यांनी सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या तीन पथकांनी सोमवारी तीन ठिकाणी धाडी टाकून झाडाझडती घेतली. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.अकोला तालुक्यातील म्हैसांग येथील शेतकरी आणि अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडते शशिकांत गणेश मानकर यांनी ३१ मे रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली. गणेश मानकर यांनी सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार त्यांचे भाऊ हरीश मानकर यांनी १ जून रोजी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांकडे केली. त्यानुसार या प्रकरणात जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सावकारी प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये १ जून रोजी अकोला शहरातील दोन ठिकाणी आणि म्हैसांग येथील एका ठिकाणी अवैध सावकारीचे आरोप असलेल्या तीन जणांच्या घरी धाडी टाकून झाडाझडती घेण्यात आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या तीन पथकांमार्फत तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या व झाडाझडती घेण्यात आली असून, यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली.
सावकारी जाचातून शेतकऱ्याची आत्महत्या; तीन ठिकाणी धाडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 10:16 AM