अकोला: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी हजारो शेतकर्यांनी कृषी विभागामार्फत अर्ज केले. २0१५ व २0१६ या वर्षासाठी ठिबक सिंचन योजनेचे १ कोटी १२ लाख रुपयांचे अनुदान कृषी विभागाला प्राप्त झाले. सप्टेंबर महिन्यात हे अनुदान शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले; परंतु शेतकर्यांच्या बँक खात्यात ठिबक सिंचनाचे अनुदान जमा होऊनही त्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. यासंदर्भात शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील मोझर येथील ज्ञानेश्वर त्र्यंबकराव भिवरकर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केलेल्या तक्रारीनुसार, कृषी विभागाकडे ठिबक सिंचनासाठी शेतकर्यांनी अर्ज केले होते. ठिबक सिंचन योजनेचे अनुदान नोव्हेंबर २0१५ मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले. ठिबक सिंचनासाठी अनुदान म्हणून जिल्ह्यातील शेतकर्यांकरिता १ कोटी १२ लाख रुपये कृषी विभागाला प्राप्त झाले. सप्टेंबर महिन्यात हे अनुदान शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. कृषी विभागाने प्रस्ताव मंजूर करतेवेळी बँक पासबूकची छायांकित प्रत घेऊन शेतकर्यांच्या खातेक्रमांकांबाबत शहानिशी केली. अशा परिस्थितीत शेतकर्यांना त्यांचे ठिबक सिंचनाचे अनुदान मिळणे गरजेचे असतानासुद्धा अनुदानाची रक्कम प्राप्त झाली नाही. एक हजाराच्या आसपास शेतकर्यांचे अनुदान राज्य शासनाकडून प्राप्त होऊनसुद्धा बँक ऑफ महाराष्ट्रने ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नाही. यातील अनेक शेतकर्यांनी कर्ज काढून ठिबक सिंचन शेतावर बसविले. शुक्रवार, २0 मे रोजी तक्रारकर्ते ज्ञानेश्वर भिवरकर पाटील यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांकडे चौकशी केली. तुमचा प्रस्ताव नोव्हेंबरमध्येच बँक ऑफ महाराष्ट्रच्या जठारपेठ शाखेत दिला असून, त्याचे स्मरणपत्रसुद्धा २0 फेब्रुवारी २0१६ रोजी दिले आहे. आपल्या प्रस्ताव कोणतीही चूक नसून, उपरोक्त प्रकरणी बँकेशी संपर्क साधण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी स्पष्ट केले. त्यानुसार भिवरकर यांनी जठारपेठ शाखेत संपर्क साधला असता, त्यांना अनुदानाची रक्कम बँकेकडे पडून असल्याचे समजले. त्यांनी बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधल्यावर, सोमवारी या, असे त्यांनी भिवरकर यांना सांगितले.
ठिबक सिंचनाच्या अनुदानापासून शेतकरी वंचित!
By admin | Published: May 24, 2016 1:35 AM