आलेगाव(अकोला) : रानडुकरांच्या हल्ल्यापासून बचाव करताना विहीरीत पडल्याने ३६ वर्षीय शेतकºयाचा मृत्यू झाला. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी पातूर तालुक्यातील पिंपळडोळी शिवारात घडली. दीपक विठ्ठल डाखोरे असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.पातुर तालुक्यात वन्यप्राण्यांचा हैदोस सुरू आहे. या वन्यप्राण्यांपासून आपली पिके वाचविण्यासाठी शेतकरी दिवसा व रात्री मेहनत करतात. परंतु तरीही वन्यप्राण्यांकडून पिकांची नासधूस होते. पातूर तालुक्यातील पिंपळडोळी येथील शेतकरी दीपक विठ्ठल डाखोरे यांनी एक शेत बटाईने केले आहे. त्या शेतात भुईमुगाचे पीक आहे. भारनियमनामुळे डाखोरे हे शुक्रवारी रात्री पिकाला रात्री पाणी देण्यासाठी गेले होते. पिकात शेतात रानडुकरे शिरल्याचे त्यांना दिसले. या रान डुकरांना शेताच्या बाहेर हाकलण्यासाठी ते त्यांच्या मागे धावले. परंतु रानडुकरांनी डाखोरे यांच्यावर उलट हल्ला केला. रानडुकरांपासुन वाचण्याच्या प्रयत्नात डाखोरे त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले. त्यांना पोहता येत नसल्याने विहिरीच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर खळबळ उडाली. सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली. रान डुकरांपासून पिकांचा आणि शेतकऱ्यांचा बचाव व्हावा यासाठी वन विभागाने ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी वारंवार मागणी होऊनही फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. मृतक शेतकरी डाखोरे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांवर आता मोठे संकट कोसळले असल्याने वनविभागाने त्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 4:33 PM