- रवी दामोदर
अकोला: योग्य नियोजन व मेहनतीच्या भरवशावर खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्याने ॲप्पल बोरची शेती फुलवली आहे. ही किमया सांगळूद येथील शेतकरी गणेश विश्वनाथ राऊत यांनी केली असून, कमी खर्चात फायदेशीर शेती करून उन्नतीचा मार्ग शोधला आहे. राऊत यांनी लागवड केलेले बोराची शेती आता सद्यस्थितीत फळाला आली असून, इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
दरवर्षी वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे खरीप हंगामात होणारे नुकसान व शेतकऱ्यांना मिळत असलेला कमी भाव यामुळे गणेश राऊत यांनी पारंपरिक शेतीला बगल देण्याचा निश्चय केला. शेतीमध्ये काहीतरी वेगळे करून दाखविण्याच्या ध्यासापोटी ते विविध कृषी प्रदर्शन फिरले. नागपूर येथील कृषी प्रदर्शनात राऊत यांच्या डोक्यात ॲप्पल बोराची शेती करण्याचा विचार आला. त्यानंतर त्यांनी ॲप्पल बोर शेतीविषयी विविधांगी माहिती घेऊन सांगळूद शिवारात दीड एकरात पेरणी करण्याची तयारी केली. सुरुवातीला बियाण्यासाठी ठिकठिकाणी नर्सरीत चकऱ्या मारल्या. विविध ठिकाणाहून माहिती घेतल्यानंतर २०१७ मध्ये पेरणी १३ बाय १० फुट अंतरावर ॲप्पल बोरच्या रोपांची पेरणी केली. दीड एकरात त्यांनी जवळपास ४५० झाडे जगविली. सद्यस्थितीत झाडे बोरांनी लदबदलेली आहेत. दोन महिन्यात ॲप्पल बोरचे उत्पन्न घेतले जाते. दरवर्षी दीड एकरात गणेश राऊत यांना ११० क्विंटल उत्पन्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्राहकांपर्यंत थेट विक्री
खारपाणपट्ट्यात ॲप्पल बोरचा प्रयोग यशस्वी करीत बाजारपेठ उपलब्ध नसल्याने गणेश राऊत यांच्यापुढे मालाची विक्री करण्याचे मोठे संकट उभे होते. त्यांनी हार न मानता ग्राहकांच्या थेट घरी जात विक्री केली. सुरुवातीला आठवडी बाजार, तालुक्याचे ठिकाण आदी ठिकाणी जात त्यांनी ॲप्पल बोरची विक्री केली. सुरुवातीला अडचणी आल्या; मात्र संकटे पार करीत त्यांनी ग्राहकांपर्यंत माल पोहोचलविला. आता काही ग्राहक त्यांच्या शेतात भेट येऊन बोर विकत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत चारचाकी वाहनांतून ग्राहकांपर्यंत थेट विक्री करीत असल्याचे चित्र आहे.
अनेकांना मिळाला रोजगार
बोर तोडणीपासून ते विक्री पर्यंत अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. गणेश राऊत यांच्याकडे सद्यस्थितीत चार ते पाच पुरुष मजूर व चार ते पाच महिला मजूर असे १० ते १५ मजूर हे दररोज काम करीत आहेत. याचबरोबर त्यांना कुटुंबाची मदत होत असून, विक्रीसाठी माल तयार करण्याकरिता अवघे कुटुंब राबत असल्याचे चित्र आहे.
पारंपरिक शेती ही तोट्याची झाली आहे तसेच युवकांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे युवा शेतकऱ्यांनी पुढाकार घेत वेगळे प्रयोग राबवून उन्नती साधावी. शासनाने पुढाकार घेत युवकांना मार्गदर्शन करावे.
- गणेश राऊत, शेतकरी, सांगळूद.