अकोला - शहरालगत असलेल्या टाकळी जलंब शेतशिवारात गवत कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. पुंजाजी बोर्डे (४०, रा. टाकळी जलंब) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांना उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनविभागाकडून प्राप्त माहितीनुसार, पुंजाजी बोर्डे हे रविवारी दुपारी गवत कापण्यासाठी शेतात गेले असता, त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
आरडाओरडा केल्यामुळे भांबावलेल्या बिबट्याने पळ काढला. या हल्ल्यात बोर्डे यांच्या हात, पाय, मांडीवर खोल जखमा झाल्या आहेत. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वनपरक्षेत्र अधिकारी आर. एन. ओवे, वनपाल गजानन इंगळे, बेलसर, वनरक्षक एन. एम. मोरे, एस. एस. तायडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हल्ला करणारे बिबट अंदाजे २ ते ३ वर्षे वयाचे असल्याचा अंदाज आहे. दोन दिवसांपूर्वी आगर परिसरात एका शेतकऱ्यावर हल्ला करणारा बिबटच भटकत टाकळी जलंब परिसरात आला असावा, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.