- अतुल जयस्वालअकोला : अस्मानी व सुल्तानी संकटाने पिचून निघालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शासनाकडून शेतकऱ्याला नागविण्याचेच काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे सोमवारी सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली. नागपूर येथे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त साधून करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात आगर, उगवा परिसरातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना न देता हे आंदोलन करण्यात आल्यामुळे आकोट फैल पोलिसांनी आंदोलकांपैकी पाच जणांना ताब्यात घेतले.शेतकऱ्यांनी मेहनत करून पिकविलेल्या मालास हमी भाव देण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले असले, तरी त्यासाठीची प्रक्रिया किचकट असल्यामुळे त्याचा फायदाशेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. शासकीय खरेदी केंद्रे ही नुसती नावाचीच असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल नाईलाजाने व्यापाºयांना मिळेल त्या भावात विकावा लागतो. शासनाच्या या धोरणाचा फायदा केवळ मुठभर व्यापाºयांना होत आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाने पिचून गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाचे धोरण तारक ठरण्याऐवजी मारकच ठरत आहे. शेतकरी आत्महत्याचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. शासनाचे मात्र याकडे अजिबात लक्ष नसल्याचा आरोप करीत शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सोमवारी अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे सोमवारी सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली. शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई प्रदिप देशमुख, अकोला जिल्हा चिटणीस भाई दिनेश काठोके यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात आगर-उगवा परिसरातील शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांनी बैलगाडीतून सोयाबीन, ज्वारी, ओवा, तिळ, मूग, कापूस, तूर, हरभरा आदी शेतमाल भर रस्त्यावर टाकून तो पेटवून दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. रस्त्यात शेतमालाची होळी केल्याने वाहतुक अवरुद्ध होणार नाही, याची काळजीही आंदोलकांनी यावेळी घेतली.
- प्रदिप देशमुख, राज्य चिटणीस मंडळ सदस्य, शेकाप