- सदानंद सिरसाटअकोला: कीटकनाशकांची फवारणीतून विषबाधा होण्याला प्रतिबंध म्हणून फवारणी करणारे शेतमजूर, शेतकºयांची शासनाने ठरवून दिलेली तपासणी करण्याला जिल्ह्यात आरोग्य विभागाने ‘खो’ दिला आहे. विशेष म्हणजे, तपासणी करून तसे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी असताना जिल्ह्यात एकही प्रमाणपत्र दिले नसल्याची धक्कादायक माहितीही आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आली आहे.२०१७-१८ च्या संपूर्ण खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात १०४ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मृत्यूच्या संख्येमुळे शासनही हादरले. राज्यातील शेकडो मृत्यूच्या घटनांची पडताळणी उत्तर प्रदेशातील फरिदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने केली. त्यामध्ये कीटकनाशक वापरासंदर्भातील अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या होत्या.विशेष म्हणजे, या समस्येची दखल घेत राज्यपालांनी २६ मार्च २०१८ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करीत कीटकनाशकामुळे विषबाधा, मृत्यूचा अहवाल देण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, पोलीस तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची जबाबदारी निश्चित केली. सोबतच शासनाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला विशेष जबाबदारी दिली. त्यापैकी कोणताच उपाय आरोग्य विभागाने केला नसल्याचे कागदोपत्री अहवालातून दिसत आहे.- जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे कागदी घोडेप्रत्येक गावात पिकांवर फवारणी करणाºयांची आरोग्य तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात विशेष अभियान राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी ६ आॅगस्ट २०१८ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले. त्यावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने काहीच केले नसल्याचे स्पष्ट होत आहे.- आरोग्य तपासणी प्रमाणपत्रही दिले नाही!विशेष अभियानात तपासणी करून आरोग्य विभागाने त्याबाबत प्रमाणपत्र देण्याचेही शासनाने बजावले; मात्र ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावर तपासणी अभियानच राबविले नाही तर प्रमाणपत्र देणार कोण, असा गोंधळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घातला आहे. या विभागाने त्यासाठी कोणताही उपक्रम राबविलाच नसल्याने कागदोपत्री अहवाल निरंक पाठविला जात आहे. शेतकरी आत्महत्या, विषबाधेने मृत्यूसारख्या संवेदनशील विषयाकडे आरोग्य विभागाने किती दुर्लक्ष केले, हे अधोरेखित झाले आहे.- विषबाधेच्या अहवालातही तफावतअकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सप्टेंबर अखेर अहवालानुसार जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यांत तब्बल ९९ जणांना विषबाधा झाली. त्यापैकी आॅगस्टमध्ये ७७ शेतकरी, मजुरांना झालेल्या विषबाधेच्या घटनांमध्ये एकाचा मृत्यूही झाला. १३ जणांची प्रकृती गंभीर होती. जुलै- २१, आॅगस्ट- ७७, त्यापूर्वीच्या मिळून १२१ विषबाधेच्या घटना घडल्या आहेत. आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एप्रिल ते ५ नोव्हेंबरपर्यंतच्या दिलेल्या अहवालात केवळ ३४ प्रकरणे नमूद आहेत. ही तफावतही आरोग्य विभागाचे कामकाज सांगणारी आहे.