अकोला, दि. १५- बाळापूर तालुक्यातील कसुरा येथील शेतकरी महिलेला सावकाराने हडपलेली जमीन परत मिळणार आहे. सहायक निबंधक सहकारी संस्था पातूर यांनी सावकारांचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना कार्यवाहीसाठी अभिप्राय पाठविला आहे. कसुरा येथील सुनीता अशोक ताथोड यांच्या पतींनी व्याजाने रक्कम घेऊन शेती गावातील सुभाष हरिभाऊ इधोळ यांच्या मध्यस्थीने लालचंद लोडूमल बालचंदानी यांच्याकडून १ लाख रुपये व्याजाने घेऊन कसुरा येथील शेती नाममात्र खरेदीखत करून दिले होते. घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यावर खरेदीखत पलटवून देण्याचे ठरले होते. १७ हजार रुपयांच्या कर्जाऊरकमेपोटी आणखी एक खरेदीखत ईश्वर शिवराम इधोळ यांच्या नावाने करून घेण्यात आले. तसेच मागणीप्रमाणे सुनीता ताथोड यांच्या पतीला तीन लाख रुपये दिले. यासंबंधीचा करारनामा करण्यात आला. घेतलेली रक्कम व्याजासह परत केल्यानंतरही सावकारांनी जमीन परत न करता मारहाण केल्याची तक्रार सुनीता ताथोड यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. या तक्रारीवर सावकारांचे सहायक निबंधक तथा सहायक निबंधक सहकारी संस्था पातूर यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून सावकारांचे सहायक निबंधक यांनी सुनील हरिभाऊ इधोळ व ईश्वर शिवराम इधोळ यांच्याविरुद्ध निकाल दिला आहे. दोन्ही गैरअर्जदारांनी सदर शेतजमीन अर्जदार सुनीता ताथोड आणि त्यांचे पती यांच्या संयुक्त नावे होण्याचे आदेश देण्याची विनंती सावकारांचे सहायक निबंधक तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था पातूर यांनी केली आहे.
शेतकरी महिलेला मिळणार सावकाराने हडपलेली जमीन
By admin | Published: September 16, 2016 3:10 AM