राहुल सोनोने/अकोला, दि. 12 - दोन महिने उलटुनही दमदार पाऊस होत नसल्याने खरिपातील पीक धोक्यात आली आहेत. खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी भीती बळीराजाला सतावत आहे. अशातच हंड्याने पाणी देउन पिकांना वाचवण्याची धडपड प्रत्येक शेतकरी करत असल्याचे चित्र दिग्रस परिसरात दिसत आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही पावसाचा थांगपत्ता नसल्याने खरिपातील उभे डोलणारे पीक आता सलाइनवर जगत असून शेवटची घटका मोजत असल्याने शेतक-यांच्या चिंतेत आणखी भर पडली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले असतले तरी अद्याप नदीनाले, विहिरींना फारसे पाणी आले नाही. त्यामुळे कोरड्या दुष्काळाची भीती शेतक-यांना वाटत आहे. ऑगस्ट महिना सुरू असुनही मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
पाऊस अत्यल्प झाल्याने खरिपातील उडीद, मूग, ज्वारी ही पीके नसल्यागत जमा झाली आहेत. त्याचबरोबर कापूस व सोयाबीन या पिकांना धोका निर्माण झाला असून हंगाम वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.