रवी दामोदर
अकोला : यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या असून, शेतशिवारात पिके डोलत आहेत. सध्या फवारणीला वेग आला असून, विषबाधा होण्याच्या घटनाही समोर येत आहेत. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत दोन जणांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करताना काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात गतवर्षी दर आठवड्याला दोघांना फवारणीतून विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहे. गतवर्षी मिळून आतापर्यंत ८० जणांना फवारणीतून विषबाधा झाली आहे. उपचारानंतर सर्वजण बरे झाले, परंतु, फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
दरवर्षी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांचा वापर सर्रास वाढत आहे. मजुरी महागल्याने तणनाशकाकडे शेतकरी वळला आहे. गत तीन-चार वर्षांमध्ये फवारणीमुळे विषबाधा होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून लक्षात येते. यंदाच्या खरीप हंगामातील पिके शेतात डोलत असून, कीटक, तणांपासून पिकांचे रक्षण व्हावे, यासाठी शेतकरी फवारणी करीत आहेत. यादरम्यान फवारणी करताना शेतकरी- शेतमजूर योग्य ती काळजी घेत नसल्याने अनेकांना विषबाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात एकूण ७८ व यंदा २ शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे आहे. या सर्व रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच काही जणांवर खासगी रुग्णालयात देखील उपचार झाल्याची माहिती असून उपचारांती हे सर्वजण बरे झाले आहेत.