अकोला, दि. १९- स्व. साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनी राज्यभर शेतकरी प्रश्नांवर मंथन करण्यासाठी व शेतकरी समस्यांचे मूळ असलेले शेतकरीविरोधी कायदे व धोरणांचा निषेध करण्यासाठी रविवारी अकोल्यातील गांधी जवाहर बागेसमोर शेतकरी पुत्रांनी एकदिवसीय अन्नत्याग आत्मक्लेश आंदोलन केले. देशभरात झालेल्या लाखो शेतकर्यांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व शेती व शेतकर्यांची एकंदर दशा आणि दिशा यावर मंथन करण्यासाठी मोठय़ा संख्येने शेतकरी व शेतकरीपुत्र या अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले. शेतकरी संघटना युवा आघाडी अकोला जिल्हाचे अध्यक्ष अविनाश पाटील नाकट यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.हे अन्नत्याग आंदोलन शेतकरीविरोधी कोडग्या व्यवस्थेवर ओढलेला आसूड ठरावा, या निमित्ताने शेती व शेतकर्यांची दुरवस्था करणार्या धोरणांविरोधात ठिणगी उठावी व शेती व शेतकर्यांची स्थिती सुधारण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव, हक्काची संपूर्ण कर्जमुक्ती व सर्व शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यात येऊन खर्या अर्थाने बळीचे राज्य यावे, असे विचार या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केले.अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी मोठय़ा संख्येने शेतकरी पुत्रांनी उपस्थिती लावली. बळीराजाच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचा संकल्प या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन शेतकर्यांच्या भावना जाणून घेतल्या. शेतकर्यांना भेडसावणार्या समस्या व प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन डॉ. पाटील यांनी उपस्थित शेतकर्यांना दिले. अन्नत्याग आंदोलनासाठी डॉ. अभय पाटील, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. सीमा तायडे, भाजपाचे माजी महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, डॉ. नीलेश पाटील, धनंजय मिश्रा, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, डॉ. गजानन नारे, किशोर बळी, प्रकाश मानकर, भाई रजनीकांत, प्रशांत बुले, मराठा सेवा संघाचे अशोक पटोकार, प्रदीप चवरे, डॉ. विजय जाधव, पंकज जायले, इंदुमती देशमुख, वनिता गावंडे, अविनाश पाटील, प्रदीप गुरुखुद्दे, संतोष खुमकर, युनूस खान, सुरेश राऊत, प्रा. दिवाकर पाटील, प्रा. दिनकर पाटील, सुनील जानोरकर, राजेश वाघोडे, दीपक नकासकार, आकाश दांदळे, चाँद खा व अकोला जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतूनही शेतकर्यांची उपस्थिती होती. संचालन धनंजय मिश्रा व आभारप्रदर्शन आकाश दांदळे यांनी केले.अकोट येथेही अन्नत्यागअकोट येथे साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबीयांना कवितेतून श्रद्धांजली देण्यात आली. शेतकरी चर्चासत्र घेण्यात आले. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. शेतकरी कर्जमुक्तीच्या घोषणा देण्यात आल्या.
अन्नदात्यांसाठी शेतकरी पुत्रांचा अन्नत्याग!
By admin | Published: March 20, 2017 2:47 AM