जून महिना उलटून गेल्यावरही हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जून महिन्यात मोसमी वाऱ्यासह पाऊस सक्रिय होणार गतवर्षीच्या सरासरीपेक्षा पाऊस जास्त प्रमाणात पडणार, असा अंदाज फोल ठरला. मृग नक्षत्र समाप्त होऊनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. वेळेवर पाऊस न झाल्यास, यंदा उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. खारपाणपट्ट्यातील शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असते. या वर्षी हवामान विभागाच्या अंदाजानुसार दमदार पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे.
३० टक्के पेरण्या लांबल्या.
पावसाअभावी परिसरात २५ ते ३० टक्के पेरण्या लांबल्या आहेत. जून महिना संपला व जुलै सुरू झाला, पण पावसाचा पत्ता नसल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे स्थिरावले आहेत. केव्हा पाऊस येईल व पेरण्या कधी पूर्ण होतील. अशी चिंता सतावत आहे. आठवड्यात पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता नाकारता नाही.
पिकांना संजीवनी देण्याचा प्रयत्न
काही शेतकरी कृत्रिम पाणी देऊन कोवळी पिके टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु गोरगरीब शेतकऱ्यांचे सर्व काही नैसर्गिक पाण्यावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, मूग, सोयाबीन, उडीदच्या पेरण्या आटोपल्या, परंतु आता पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
कोवळ्या पिकांची वाढ खुंटली
पावसाळ्याचे दिवस असतानाच उन्हाळ्यासारखे ऊन तापत असल्यामुळे, दहीहांडा परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी त्रस्त झाले आहेत. तापत्या उन्हामुळे कोवळ्या पिकांची वाढ खुंटली आहे. पिके माना खाली टाकत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहेत.