वसाली, पांगरताटी, झरंडी, सावरगाव या चार गावांचा प्रभार तलाठी तौफिक अहमद यांच्याकडे असून सावरगाव मुख्यालय आहे; परंतु तलाठी कार्यालयच उघडत नाही. २०२० च्या सप्टेंबर महिन्यामध्ये सावरगाव परिसरात अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये जवळपास ७ ते ८० ग्रामस्थांची घरे कोसळली होती. काही लाभार्थींना लाभ मिळाला; परंतु काहींचे खाते क्रमांक तलाठ्यांनी चुकीचे दिल्यामुळे आतापर्यंत अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तसेच फेरफार नोंदी, वारसाच्या नोंदी, विहिरी व बोअरवेल आदी नोंदी प्रलंबित आहेत. तलाठी गावात येत नसल्याने शेतकऱ्यांना बँकेकडून कर्जासाठी लागणारी कागदपत्रे मिळत नसल्याने शेतकरी बँकेच्या कर्जापासून वंचित आहेत. शेतकरी विविध कामांसाठी सावरगाव येथे तलाठी कार्यालयावर सकाळपासून सायंकाळपर्यंत ताटकळत तलाठ्याच्या प्रतीक्षेत बसतात; परंतु तलाठी येत नसल्याने तसेच शेतकरी कामाविना घरी परततात विविध कामासाठी शेतकरी तलाठ्यास संपर्क करतात; परंतु त्यांचा नेहमी फोन बंद असतो. याबाबत ग्रामस्थांनी पातूरचे तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या; परंतु दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
तलाठ्याची मुजोरी, शेतकरी त्रस्त
पावसाळ्यापूर्वी शेतकरी पेरणीसाठी खत, बियाणे, खरेदी करण्यासाठी बँकेतून कर्ज काढतात त्यासाठी तलाठ्याकडून कागदपत्रे लागतात; परंतु तलाठी गावात येत नसल्याने शेतकरी कागदपत्रांपासून वंचित आहे. पावसाळा येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला तरी तलाठ्याकडून कागदपत्रे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रतिक्रिया
तलाठ्यांनी चुकीचा खाते क्रमांक दिल्याने मी अतिवृष्टीच्या लाभापासून गेल्या सात महिन्यांपासून वंचित आहे. याबाबत तलाठ्यास विचारले असता, ते सांगतात तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा, तहसील कार्यालयातील कर्मचारी तलाठ्यांना विचारा, अशी टोलवाटोलवीची उत्तरे देतात.