येथील अल्पभूधारक शेतकरी देवराव शिरसाट यांना सन्मान योजनेंतर्गत पात्र ठरविण्यात आले. त्यांचे अकोला येथील ओरियंटल बँकमध्ये खाते असल्याने रक्कम खाते क्रमांकावर आली आहे; परंतु बँकेचे नाव क्षेत्रीय ग्रामीण बँक दर्शविण्यात आल्याने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शेतकरी एक वर्षापासून दोन्ही बँकांमध्ये पायपीट करत असून, बँक अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
मागील वर्षीपासून केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात देण्यात आले. येथील शेतकरी देवराव शिरसाट यांच्या नावे बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली; परंतु बँकेचे नाव वेगळेच असल्याने सदर शेतकरी दोन्हीही बँकांमध्ये एका वर्षांपासून चकरा मारत आहे; परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत दखल घेतली नसल्याने पात्र असूनही शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आलेल्या मदतीपासून वंचित आहेत. वरिष्ठ अधिकारी यांच्यासह बँक अधिकारी यांनी लक्ष देऊन रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.