- रवी दामोदर
अकोला: अकोला-नीमकर्दा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. एकीकडे विकासकाम सुरू आहे; मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांचे स्वप्न हे धुळीने माखले आहे. या मार्गाने जाणा-या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यालगतच्या शेतांना धुळीचा फटका बसत आहे. धुळीमुळे रस्त्यालगत असलेल्या शेतक-यांच्या उभ्या पिकावर धूळ बसून तूर पिकांचे नुकसान होत आहे. अकोला ते निमकर्दादरम्यान जवळपास १०० ते १५० हेक्टरवरील पीक धोक्यात सापडले आहे.
यंदा खरीप हंगामात सततचा पाऊस व परतीच्या पावसाचा फटका सर्वच पिकांना बसला आहे. यावर्षी शेती व्यवसाय हा पूर्ण तोट्यात आला असून, त्यामध्ये भरीस भर म्हणून धुळीमुळे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अकोला-निमकर्दा मार्ग अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गाचे काम सुरू असून, मुरूम टाकण्यात आला आहे. या मार्गाने जाणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडून कडेला असलेल्या शेतातील पिकांवर जाऊन बसते. यामुळे पिकांचे नुकसान होत असून, शेतकरी संकटात सापडला आहे. धुळीमुळे पिकांचे होणारे नुकसान थांबविण्याकरिता उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
पाणी मारूनही उपयोग नाही!
शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर रस्त्यावर पाणी मारण्यात येत आहे; मात्र उन्हाचा पारा वाढल्याने अवघ्या काही मिनिटातच रस्त्यावरील पाणी सुकून जात असल्याने पुन्हा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे पाणी मारून काहीही उपयोग होत नसल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे.
रात्री अपघाताची शक्यता वाढली!
रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दिवसा थोडेफार दिसत असले, तरी रात्री य मार्गाने वाहन चालविणे कठीण झाले आहे.
रस्त्याच्या दुळीमुळे माझ्या शेतातील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांवर धूळ साचल्यामुळे उत्पादनात निम्मे घट झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन मदत करावी.
- गजानन पकदाने, शेतकरी, गायगाव.
रस्त्यावरील धूळ, माती पिकांवर बसल्याने नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या नाहीत; मात्र धुळीमुळे पिकांच्या गुणवत्तेवर काही प्रमाणात परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: कपाशीच्या पिकावर परिणाम दिसून येऊ शकतो.
- प्रा. ए.एन. पटलावार, कृषी विद्या विभाग,डॉ. पीडीकेव्ही, अकोला