- संतोष येलकरअकोला : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारकडून मंगळवारी करण्यात आली. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये विविध उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या; मात्र दुष्काळी दुष्टचक्राच्या संकटात सापडलेल्या शेतकºयांसाठी मदतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे पीक नुकसान भरपाईपोटी सरकारकडून मदत केव्हा जाहीर होणार, याबाबतची आस आता दुष्काळी तालुक्यांतील शेतकºयांना लागली आहे.राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली असून, उपाययोजनांना सुरुवात होणार असल्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये टंचाई निवारणासाठी सरकारमार्फत जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज देयकात सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकरद्वारे पाणी पुरवठा योजना, टंचाईग्रस्त गावांतील शेतकºयांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादी उपाययोजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली; परंतु दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये संकटात सापडलेल्या शेतकºयांसाठी मदत मात्र अद्याप जाहीर करण्यात आली नाही. पावसातील खंड, भूजल पातळी,जमिनीतील आर्द्रतेचे प्रमाण कमी आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाल्याच्या पृष्ठभूमीवर, पीक नुकसान भरपाईपोटी सरकारकडून मदत केव्हा जाहीर होणार, याबाबतची प्रतीक्षा संकटात सापडलेल्या शेतकºयांकडून केली जात आहे.अमरावती विभागातील दुष्काळसदृश असे आहेत २७ तालुके!सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या १८० तालुक्यांमध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील २७ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामध्ये अकोला जिल्हा : अकोला, बाळापूर, तेल्हारा, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर. अमरावती जिल्हा : अचलपूर, चिखलदरा, मोर्शी, वरुड, अंजनगाव सुर्जी. बुलडाणा जिल्हा : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, मोताळा, सिंदखेड राजा. वाशिम जिल्हा : रिसोड. यवतमाळ जिल्हा : बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, मारेगाव, राळेगाव, उमरखेड व यवतमाळ इत्यादी तालुक्यांचा समावेश आहे.