लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी, नाफेडद्वारे तूर खरेदी व देयके सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ‘एल्गार’ पुकारीत शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि संपूर्ण कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला.शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, नाफेडद्वारे तूर खरेदी व तूर खरेदीची देयके सुरळीत करण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. निवेदनात शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या मोर्चात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, सतीश देशमुख, ललित बहाळे, डॉ. श्रीकांत तिडके, प्रशांत गावंडे, अविनाश नाकट, विजय लोडम, विजय मोरे, ज्योत्स्ना बहाळे, विलास ताथोड, धनंजय मिश्रा, डॉ. नीलेश पाटील, मनोज तायडे, विजय देशमुख, राजाभाऊ देशमुख, बाळासाहेब तायडे, गुलाबराव म्हसाये, लक्ष्मीकांत कौठकर, प्रफुल्ल बदरके, मोहंमद साजिदभाई, अरविद तायडे, रवींद्र ठाकरे, शरद सरोदे, पंकज वानखडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते व जिल्हय़ातील शेतकरी सहभागी झाले होते.
..तर सत्ताधारी पुढार्यांना विचारला जाणार जाब! शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या प्रस्तावावर शासनाने गांभीर्याने विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून, जेथे-जेथे सत्ताधारी पुढार्यांच्या सभा होतील तेथे-तेथे त्यांना संपूर्ण कर्जमाफीबाबत जाब विचारला जाईल, असा इशाराही शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदनात देण्यात आला आहे.
प्रस्तावाचा विचार करा; अन्यथा ३ सप्टेंबर रोजी उपोषण!शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासंदर्भात शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या प्रस्तावावर शासनाने गांभीर्याने विचार करावा; अन्यथा ३ सप्टेंबर रोजी (शरद जोशी यांची जयंती) राज्यात शेतकरी एक दिवस उपोषण करणार असून, शासनाच्या शेतीविरोधी भूमिकेचा निषेध करण्यात येणार आहे, असा इशारा शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदनात देण्यात आला आहे.