अकोला, दि. २७- गत तीन वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. विपरीत आर्थिक परिस्थितीला तोंड देत शेतकर्यांनी खरीप हंगामासाठी पेरणी केली. जुलै महिन्यात पावसाने शेतकर्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र ऑगस्टमध्ये पडलेल्या प्रदीर्घ उघडीपामुळे सोयाबीनसह अन्य पिकांसाठी शेतकर्यांनी पाहलेल्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. अशात पीक विम्याच्या शासनाद्वारे अधिकृत विमा एजन्सीस शोधत शेतकरी असून या विमा कंपनीचा ठावठिकाणाच उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे.शेतातील पिकांना आर्थिक सुरक्षा देण्याच्या हेतूने केंद्र शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना या वर्षी जानेवारी महिन्यातच लागू केली. या योजनेची अंमलबजावणी राज्य शासनानाद्वारे १ एप्रिलपासून करण्याचे सूतोवाच केले गेले. या योजनेची अंमलबजावणीदेखील झाली. अकोला जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकर्यांनी त्यांच्या कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांचा विमादेखील उतवरला; मात्र अद्याप कुठल्या पीक विमा कंपनीद्वारे त्यांचा पीक विमा उतरविला गेला याची साधी माहितीदेखील शेतकर्यांना मिळू शकली नाही. अखेर त्रस्त होऊन अकोला येथील प्रा. दिनकर पाटील यांनी पीक विम्यासंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवली. त्यावेळेस त्यांना शासनाद्वारे नियुक्त पीक विमा कंपनीबद्दल कळविण्यात आले. विशेष म्हणजे शासकीय योजनांच्या प्रसारासाठी शासन मोठय़ा प्रमाणात खर्च करीत असताना कुठल्या जिल्ह्यात कुठली विमा कंपनी पीक विम्यासाठी अधिकृत केली आहे, याची साधी माहितीदेखील शेतकर्यांपर्यंत पोहचू शकली नाही. एवढेच नाही तर कृषी विभागाच्या वेब पोर्टलवरदेखील शेतकर्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली माहिती उपलब्ध नव्हती. जिल्ह्यात कृषी अधीक्षक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार चालू वर्षाच्या खरीप हंगामापासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली असून अकोला जिल्ह्यासाठी शासनाने इफको टोकियो या विमा कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीचे कार्यालय टिळक रोडवरील आकाश टॉवर बिल्डिंगमध्ये आयसीआय बँकेवरील दुसर्या मजल्यावर आहे.शेतकर्यांनी काढलेला पीक विमा कुठल्या विमा कंपनीद्वारे काढण्यात आला, याची माहितीदेखील शेतकर्यांसाठी उपलब्ध नसल्यामुळे अखेर माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. कृषी अधीक्षक कार्यालयाने ती माहिती उपलब्ध करून दिली; मात्र अद्याप पीक विम्याची तालुकानिहाय माहिती पीक विमा कंपनीच्या वेबसाइडवर टाकली गेली नाही. त्यामुळे ही माहिती विमा कंपनीच्या वेबसाइडवर टाकावी जेणेकरून शेतकर्यांना त्यांच्या पीक विम्याबाबत अधिकृत माहिती मिळू शकेल. - प्रा. दिनकर पाटील, अकोला
पीक विम्यासाठी शेतकरी हतबल
By admin | Published: September 28, 2016 1:51 AM