वाडेगाव : शेतात मक्याच्या पिकाला पाणी देत असलेल्या शेतकऱ्यावर दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना वाडेगाव शेतशिवारात मंगळवार, ४ मे रोजी सकाळी घडली. सुरेश रामचंद्र लोखंडे (६०)असे या शेतकºयाचे नाव असून, त्यांना उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.वाडेगाव येथील सुरेश लोखडे हे कांदा पिकाची राखण करण्याकरीता शेतातच मुक्कामाला आहेत. मंगळवारी सकाळी शेतातील मका पिकाला पाणी देत असताना त्यांना मक्याच्या दाट पिकात हालचाल लक्षात आली. समोर बिबट असल्याचे लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. सुरेश लोखंडे यांनी आरडोओरड केल्यामुळे शेजारच्या शेतात असलेले हरीभाऊ दुतोंडे हे धावून आले. त्यांनी काठीने बिबट्यावर वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भांबावून गेलेल्या बिबट्याने तेथून धूम ठोकली व सुरेश लोखंडे यांचे प्राण वाचले. जखमी झालेल्या लोखंडे यांना तातडीने वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाडेगाव येथे धाव घेऊन बिबट्याला शोधण्याची मोहिम हाती घेतली आहे. शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने वाडेगाव परिसरातील शेतकºयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.