मनात्री: परिसरात अतिवृष्टीमुळे शेतातील पिके नष्ट झाली हाेती. काही पिके वाहून गेली हाेती. साेयाबीच्या पिकालाही फटका बसला. दरम्यान, कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्यामुळे कपाशीचे उत्पादन घटले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. याकडे शासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
यावर्षीच्या हंगामात ऐन पीक काढणीच्या वेळेला अवकाळी पावसाने थैमान घातले. पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यासाठी जवळपास २७ कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती समाेर आली हाेती; मात्र अद्यापही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासन शेतकऱ्यांच्या मरणाची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.
----------------
अवकाळी पावसाने सोयबीनचे प्रचंड नुकसान होऊन अनेक महिने उलटले. शासनाने फक्त मदतीचे आश्वासन दिले; मात्र अद्यापही दमडीची मदत नाही. आता सरकारने त्वरित मदत द्यावी, शेतकऱ्यांचा अंत पाहू नये.
- सागर पाटील कोकाटे, बाभुळगाव
----------------
दिवसेंदिवस शेतकरी हवालदिल होत आहेत. शासनाकडून कोरड्या घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात मदत नाहीच. शेतकरी आर्थिक संकटात आहेत. शासनाने आता तरी लक्ष देऊन मदत द्यावी.
- अरुण भा. वैतकार, बाभुळगाव