लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वीज वितरण कंपनीने नेमलेला कंत्राटदार सुमित इलेक्ट्रिकल्सचा इमाने याने शेतापर्यंत विद्युत खांबावरून विद्युत तारांचे कनेक्शन देण्यासाठी धोतर्डी, वरोडी गावांतील अनेक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी दोन ते तीन हजार घेतले; परंतु अद्यापपर्यंत विद्युत तारा शेतापर्यंत पोहोचल्या नाही. दोन, तीन वर्षांपासून वीज कनेक्शन मिळत नसल्याने पिके धोक्यात आली. हा विषय आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी अभियंता केनेकर यांना बोलावून आमदार शर्मा, आमदार सावरकर यांनी जाब विचारला आणि शेतकऱ्यांची समस्या तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले आणि शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास बजावले. अकोला पूर्व मतदारसंघात येणाऱ्या धोतर्डी, वरोडी गावांमधील शेतकरी नीलेश हरिभाऊ पागधुने, आशुतोष विष्णू निशाने, डाबेराव यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना दोन ते तीन वर्षांपासून वीज वितरण कंपनी विजेचे कनेक्शन देण्यास दिरंगाई करीत आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विद्युत खांब गेले असतानाही त्यांना विजेचे कनेक्शन देण्यास वीज वितरण कंपनी टाळाटाळ करीत आहे. कंपनीने नियुक्त केलेला सुमित इलेक्ट्रॉनिक्सचा इमाने नामक कंत्राटदाराने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत विद्युत तारा नेण्यासाठी प्रत्येकी दोन ते तीन हजार रुपये घेतले; परंतु अनेक महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विद्युत तारा पोहोचल्या नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे समस्या मांडल्यावर त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, महापौर विजय अग्रवाल, मनपा स्थायी समिती सभापती बाळ टाले, भाजपचे शहराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, गिरीश जोशी उपस्थित होते. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या इमाने कंत्राटदाराविरुद्ध तक्रार करण्यात आली; परंतु घटनास्थळ बोरगाव मंजू पोलीस ठाण्यांतर्गत येत असल्याने, सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार विष्णुकांत गुट्टे यांनी बोरगाव पोलिसांकडे तक्रार करण्याची सूचना शेतकऱ्यांना केली. यावेळी आमदार शर्मा, आमदार सावरकर यांनी वीज वितरण कंपनीचे अभियंता केनेकर यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना धारेवर धरले आणि तातडीने कंत्राटदारावर कारवाई करा, शेतकऱ्यांना वीज कनेक्शन द्या, असे निर्देश दिले. कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार करणारधोतर्डी, वरोडी गावांमधील शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या कंत्राटदार इमानेविरुद्ध शेतकरी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आहेत, तसेच त्याची वीज वितरण कंपनीकडेही तक्रार करण्यात आली.
शेतकऱ्यांची आमदारद्वयांसह पोलीस ठाण्यात धडक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 1:05 AM