- संतोष येलकरअकोला : गतवर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चौथ्या टप्प्यातील ६१ कोटी ६९ लाख रुपयांची दुष्काळी मदत अद्याप शासनाकडून मिळाली नाही. यासोबतच गतवर्षी अतिवृष्टी व पुरामुळे पीक नुकसान भरपाईपोटी शासनामार्फत मदत मंजूर करण्यात आली असली तरी, जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ कोटी ५१ लाख रुपयांचा मदतनिधीही मिळाला नाही. यावर्षीच्या पावसाळ्यात कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याच्या स्थितीत शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यानुषंगाने दुष्काळी आणि अतिवृष्टीच्या मदतीचा निधी मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गत २३ आॅक्टोबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. त्यानुषंगाने दुष्काळग्रस्त पाचही तालुक्यांतील शेतकºयांच्या मदतीसाठी गत फेबु्रवारी अखेरपर्यंत शासनामार्फत तीन टप्प्यांत १३७ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. उपलब्ध दुष्काळी मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आली; मात्र दुष्काळी मदतीच्या चौथ्या टप्प्यातील ६१ कोटी ६९ लाख रुपयांचा मदतनिधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही. त्यामुळे पाचही तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकरी दुष्काळी मदतीच्या चौथ्या टप्प्यातील मदतीच्या लाभापासून वंचित आहेत. तसेच गत जून ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे पीक नुकसान भरपाईपोटी राज्यातील बाधित शेतकºयांसाठी १३९ कोटी १९ लाख १८ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय गत १० जुलै २०१९ रोजी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत घेण्यात आला. २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त १३ हजार ५४९ शेतकºयांच्या मदतीसाठी ५ कोटी ५१ लाख रुपयांचा मदतनिधी अद्याप शासनाकडून प्राप्त झाला नाही. यावर्षीच्या पावसाळ्यात कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याच्या स्थितीत शेतकरी अडचणीत सापडला असताना गतवर्षीच्या दुष्काळी मदतीच्या चौथ्या टप्प्यातील मदत आणि अतिवृष्टीमुळे पीक नुकसान भरपाईची मदतही शेतकºयांना मिळाली नाही. त्यामुळे या मदतीचा निधी शासनाकडून केव्हा प्राप्त होणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मदतीच्या प्रतीक्षेत असे आहेत अतिवृष्टीग्रस्त शेतकरी!तालुका शेतकरीअकोला ३०३१तेल्हारा ५६६बाळापूर २७८०पातूर १००बार्शीटाकळी २३४५मूर्तिजापूर ४७२७.........................................एकूण १३५४९दुष्काळी मदतीसाठी ६१.६९ कोटींची मागणी!जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांना चौथ्या टप्प्यातील दुष्काळी मदत वाटप करण्यासाठी ६१ कोटी ६९ लाख रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत महिन्यात शासनाकडे करण्यात आली आहे.अकोट व पातूर तालुक्यात केव्हा मिळणार दुष्काळी मदत?जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांना शासनामार्फत तीन टप्प्यांत वितरित मदतनिधीतून दुष्काळी मदत वाटप करण्यात आली आहे; परंतु गत २१ फेबु्रवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील अकोट व पातूर या दोन तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असली तरी, या दोन्ही तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी शासनामार्फत अद्याप मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे अकोट व पातूर तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकºयांना दुष्काळी मदत मिळणार तरी केव्हा, यासंदर्भात प्रतीक्षा केली जात आहे.