लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भातील शेतकर्यांनी रब्बी हंगामासाठीच्या पेरण्याची तयारी केली असून, दमदार परतीच्या पावसाची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण घटले आहे. परतीचा पाऊस जर आला नाही, तर मात्र रब्बी हंगामातील अध्र्या अधिक क्षेत्रावरील पेरा घटण्याची शक्यता आहे. गतवर्षी पश्चिम विदर्भात अतवृष्टी झाली. परतीच्या पावसानेही चांगलाच मुक्काम ठोकल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामाला झाला होता. त्यामुळे पश्चिम विदर्भात गतवर्षी साडेआठ लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर रब्बीची पेरणी शेतकर्यांनी केली होती. पावसाचा ओलावा अधिक असल्याने रब्बी पिके चांगली होती; परंतु काढणीच्या वेळी या पावसाने शेतकर्यांना दगा दिलाच होता.रब्बी पिकांसाठी ओलाव्याची गरज असते. पण, यावर्षी संपूर्ण पावसाळ्य़ात सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. शेतकर्यांनी मात्र पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. परतीचा पाऊस न आल्यास मात्र रब्बी पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील शेतकरी रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा, तर पूर्व विदर्भात जवस या पिकाची पेरणी करतात. करडी, मोहरी व गहू या पिकांचा पेराही केला जातो. गहू पिकाला अलीकडे पाण्याची गरज असल्याने संरक्षित सिंचनाची ज्यांच्याकडे सोय आहे, ते शेतकरी गहू पेरणी करतात. तथापि, यावर्षी पश्चिम विदर्भातील काही धरणांमध्ये अल्प जलसाठा उपलब्ध आहे. नदी-नाले, शेततळ्य़ात पाणीच नसल्याने गहू पिकाचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
परतीच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकर्यांनी २५ ऑक्टोबरपर्यंत हरभर्याची पेरणी शक्यतो टाळावी, हरभर्याला कमी पाऊस लागतो, पेरणीनंतर जोरदार पाऊस आल्यास दुबार पेरणीची वेळ येते. ३0 ऑक्टोबरपर्यंत हरभर्याची पेरणी करता येईल.डॉ. मोहनराव खाकरे,कृषी विद्यावेत्ता,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.