अकोला : काही दिवसांवर खरीप हंगाम आला आहे. त्यामुळे शहरातील कृषी सेवा केंद्रांवर महाबीजच्या बियाणांसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शनिवारी टिळक रोडवरील महाबीज वितरकाकडे शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. दोन-तीन तासांपासून रांगेत असलेल्या शेतकऱ्यांना ऐन वेळेवर बियाणे संपल्याचे सांगण्यात आल्याने गोंधळ उडाला. यावेळी शेतकऱ्यांचे उग्र रूप पाहून पोलिसांना पाचारण करावे लागले. शेवटी सोमवारी बियाणे देण्यात येईल, असे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविण्यात आले. यावर्षी सोयाबीनची पेरणी वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार कृषी विभागाने बियाणांचे नियोजन केले आहे; मात्र यावर्षी सोयाबीनच्या बियाणांचा भाव जास्त असल्याने महाबीजच्या बियाणांसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. या बियाणांसाठी मोठ्या रांगा लागत आहे. शहरातील कृषी सेवा केंद्रांवर शनिवारीसुद्धा ही स्थिती कायम होती. टिळक रोडवरील महाबीज वितरकाकडे सकाळपासून शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या; परंतु दुपारी अचानक बियाणे संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उन्हात ताटकळत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांचा पारा चढला व मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांनी शेतकऱ्यांना शांत करीत सोमवारी बियाणे आल्यावर घेऊन जावे, असे सांगितले आहे.
दोन-तीन तासांपासून उन्हात ताटकळत
महाबीजचे बियाणे खरेदीसाठी शेतकरी दोन-तीन तासांपासून उन्हामध्ये ताटकळत उभे होते. या ठिकाणी सावलीसाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागत आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
बियाणांसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून उभे राहावे, अशा कुठल्याही सूचना व व्यवस्था करण्यात आली नव्हती. दहा फुटांमध्ये २५-३० शेतकरी उभे होते. त्यामुळे येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. हीच स्थिती इतर कृषी सेवा केंद्रांवरदेखील होती.
१४० क्विंटल बियाणे वाटप
शनिवारी सकाळपासून शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे वाटप सुरू होते. टिळक रोडवरील एका कृषी सेवा केंद्रांवर बियाणांची कमतरता असल्याने केवळ १४० क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले.
१०० कुपन वाटप
बियाणे वितरकाकडे गोंधळ उडाल्याने यावेळी शेतकऱ्यांना कुपन वाटप करण्यात आले. या शेतकऱ्यांना सोमवारी येण्याचे सांगण्यात आले आहे. जवळपास १०० कुपन वाटप झाले आहे. शेतकऱ्यांनीही प्रत्येकी तीन बॅगा देण्यात याव्या, अशी मागणी केली.
बियाणे विक्रेते म्हणतात...
उपलब्ध बियाणांचे वाटप करण्यात आले. उद्या काही बियाणे माल येणार आहे. शेतकऱ्यांना सोमवारी यावे असे सांगितले. ज्या शेतकऱ्यांकडे कुपन आहे अशांना सोमवारी बियाणे वाटप करण्यात येणार आहे.
- सुभाष सावजी, बियाणे विक्रेता
शेतकरी म्हणतात...
सकाळपासून महाबीजच्या बियाणांसाठी रांगेत उभे आहोत; परंतु येथे बियाणे वाटपाबाबत कुठलेही नियोजन नाही. ऐन वेळेवर बियाणे संपल्याचे सांगितले. आता सोमवारी पुन्हा यावे लागणार आहे. ग्रामीण भागात राहत असल्याने येणे-जाणे अडचणीचे ठरत आहे.
- नारायण सावळे, शेतकरी, देऊळगाव
कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातून शहरात येणे धोकादायक आहे. तरी कडक उन्हामध्ये बियाणांसाठी उभे होतो. आधीच बियाणे नसल्याचे सांगितले असते तर विनाकारण रांगेत उभे राहण्याची वेळ आली नसती. परत परत चकरा माराव्या लागत आहे.
- रामा अघडते, शेतकरी, दहिगाव गावंडे
महाबीजचे बियाणे मिळाले नाही. आता कुपन दिले आणि सोमवारी या असे सांगितले आहे. लवकर येऊन रांग लावावी लागत आहे. सावलीची कुठलीही व्यवस्था नाही. खरीप हंगाम जवळ असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे.
- बालकिशन बरदीया, शेतकरी, सांगळूद