डोणगाव (जि.बुलडाणा), दि. १९- महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे डोणगाव परिसरात सर्वेक्षण करुन खूणा करण्याचे काम सुरु आहे. याविरुद्ध शेतकर्यांमध्ये असंतोष असल्याने अखेर १९ जानेवारीला दुपारी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी, शैलेश सावजी यांच्या नेतृत्वात आंधृड येथे शेतकर्यांनी समृद्धी महामार्गाच्या खुणा उपटून सदर महामार्गाला विरोध दर्शविला आहे. मेहकर तालुक्यातील आंधृड येथील शेतकरी माणिकराव देशमुख, उद्धवराव त्र्यंबकराव देशमुख, राजकुमार माधव देशमुख, डिगांबरराव खुशालराव देशमुख, नारायणराव साहेबराव देशमुख, रंगनाथ साहेबराव देशमुख, सतिष उद्धवराव देशमुख, विठ्ठलराव शामराव देशमुख, ज्ञानबाराव शामराव देशमुख, गुणवंतराव देशमुख, दिपक ओंकारराव देशमुख, कडूबा देशमुख, गिरधर देशमुख सह शेतकर्यांनी आंधृड शिवारातील माणिकराव देशमुख यांचे शेताजवळ सर्वेक्षण होऊन गाडलेल्या समृद्धी महामार्गाच्या खूणा उपटून टाकल्या व या महामार्गासाठी एक गुंठाही जमिन देणार नाही, अशी नारेबाजी करुन शेतकर्यांनी सदर समृद्धी महामार्गाला विरोध केला. डोणगाव परिसरातून सदर समृद्धी महामार्ग जात असल्याने या प्रकल्पात अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत. विकासाचा हा महामार्ग शेतकर्यांना भूमिहीन करणारा ठरत असल्याने शेतकर्यांनी सदर समृद्धी महामार्गाला माजीमंत्री सुबोध सावजी यांच्या नेतृत्वात खुणा उपलटून विरोध दर्शविला. या अगोदरही माजी मंत्री सुबोध सावजी यांनी शेतकर्यांसाठी अकोला जिल्ह्यात विजेचे टावर तोडो आंदोलन करुन शेतकर्यांना न्याय दिला होता व आता ऐन आचार संहितेत सावजींनी समृद्धी महामार्गाच्या खुणा उपटून शेतकर्यांना न्याय देण्याचा खंबीर प्रयत्न चालविला आहे.
शेतक-यांनी हटविल्या समृद्धी महामार्गाच्या खुणा!
By admin | Published: January 20, 2017 2:24 AM