अकोट : अकोट तालुक्यातील कृषी बाजारपेठेत सोयाबीन बियाणे विक्रीकरिता उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे. सोयाबीनच्या उगवण क्षमतेची हमी कोणीही घ्यायला तयार नसल्याने कृषी केंद्र संचालकांनी बियाणे विक्रीला आणली नाहीत. तर शेतकऱ्यांना सोयाबीन पेरायचे असल्याने आंतरजिल्ह्यात बियाणे खरेदी करण्याकरिता भटकंतीची वेळ आली आहे. शेतकरी अडचणीत सापडला असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन सुस्त आहे.
गेल्या काही वर्षांपासून अकोट तालुक्यात कपाशीच्या पाठोपाठ सोयाबीनचे पेरणीक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बाजारपेठेत चांगला भावसुध्दा मिळत आहे. गतवर्षी अवकाळी पावसामुळे सोयाबीनला फटका बसला तरी मात्र शेतकरी सोयाबीनची मागणी करीत आहे. अशा स्थितीत यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनचे बियाणे खरेदी करण्याकरिता अकोट येथील कृषी बाजारपेठ शेतकऱ्यांनी पिंजून काढली आहे. परंतु सोयाबीनचे बियाणे उपलब्ध नसल्याने अमरावती, बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनच्या खरेदीकरिता शेतकरी धाव घेत आहे. त्यामुळे आंतरजिल्ह्यात सुध्दा सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा होत असल्याने तेथील कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची ओळख पटवून बियाण्यांची विक्री करावी, असे आदेश दिले आहेत. अशा स्थितीत अकोट तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची गोची झाली आहे.
अकोटात सोयाबीन बियाणेच उपलब्ध नाही!
गतवर्षीच्या खरीप हंगामात अनेक ठिकाणी सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. काही कृषी केंद्र संचालकांना भांडणतंटा मिटवत पैसे परत करावे लागले. विशेष म्हणजे यावर्षी शासनाने प्राधिकृत केलेल्या कंपन्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेची हमी न घेता दुकानदारांवर जबाबदारी ढकलत आहेत. परिणामी अकोट येथील कृषी बाजारपेठेत मात्र सोयाबीन बियाणे हद्दपार झाल्याची परिस्थिती आहे. या गंभीर बाबीकडे शासनाने, प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालत सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता करुन देणे गरजेचे आहे.