मळसूर येथील शेतकरी विलास यशवंत काळे यांच्या तक्रारीनुसार शुक्रवारी अकोला बाजार समितीमध्ये हरभरा विक्री केली. हरभऱ्याची एक लाख रुपयांची रक्कम घेऊन दुचाकीने पातूरकडे जात असताना, रस्त्यावरील सम्यक जिनिंग-प्रेसिंगजवळ त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीवरील दोघांना त्यांनी मदत मागितली. अज्ञात दोघे जण व शेतकरी काळे हे फुलारी पेट्रोल पंप येथे पेट्रोल आणण्यासाठी गेले. पेट्रोल घेऊन परत जाताना, दोघा आरोपींना शेतकरी काळे यांच्याजवळ रोख असल्याचे समजले. दोघा जणांनी काळे यांना चाकूचा धाक दाखवून, त्यांच्याकडील एक लाख रुपयांची थैली हिसकावली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
विलास काळे यांच्या तक्रारीनुसार पातूर पोलिसांनी आरोपींविरूद्ध भांदवि कलम ३९२(३४) नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार हरीश गवळी करीत आहेत.