पिंजर-महान रस्त्याची दुरवस्था, एकाच वर्षात उखडला रस्ता !
निहिदा : शासनाने लाखो रुपये खर्च करून डांबरीकरण केलेल्या रस्त्याची एका वर्षातच दुरवस्था झाली आहे. रस्ता उखडल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
वळणावर झाडेझुडपे वाढल्याने अपघाताची शक्यता
रेल : टाकळी बु. ते हनवाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झुडपे वाढल्यामुळे वळणाच्या ठिकाणी समोरील वाहन दिसत नसल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. हनवाडी ते टाकळी बुद्रुक या रोडने दोन-तीन ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
प्रवासी वाहनांच्या भाडे दरात झाली दुप्पट वाढ
पातुर : गेली अनेक महिने बंद असलेल्या प्रवासी वाहनांनी प्रवासी भाडेवाढ दुप्पट केल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अकोला-पातूर दरम्यान २० ते २५ रुपये काळी पिवळी वाहनाने प्रवासी भाडे होते. मात्र, आता ते एकीकडून ४० ते ५० रुपये दराने आकारले जात आहे.
अकोट शहरात पथदिवे बंद; नागरिकांमध्ये रोष
अकोट : शहरातील अकोला मार्गावरील शिवाजी चौक-अकोला नाकापर्यंतचे पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. सर्वत्र अंधार पसरलेला असताना कोणताही अधिकारी लक्ष देत नाही. रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे.
विझोरा-कानशिवणी बससेवा बंद
विझोरा : कोरोनामुळे कानशिवणी-विझोरा मार्गावरील सर्व बसफेऱ्या बंद आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना अनेक ठिकाणी बससेवा सुरू करण्यात आली. परंतु, विझोरा मार्गावरील बस सेवा अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने, प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर येवता, कुंभारी, कातखेड, विझोरा, येळवण कानशिवणी व अन्य गावांचा समावेश आहे.