पातूर: तालुक्यातील सावरखेडा येथील तीन शेतकऱ्यांची जमीन पिकांसह खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात रविवारी मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. मेडशी वन परिक्षेत्रातील कोलदरीच्या जंगलातून वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्याने सावरखेड येथील विजय हिरामण राठोड, वसंत महादेव देवकर आणि भास्कर राऊत यांच्या शेतात पाणी शिरून शेतजमीन पिकांसह खरडून गेली आहे.
सावरखेड येथील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनला पसंती देत पेरणी केली. परिसरात सोयाबीनचा पेरा चांगला आहे. सद्यस्थितीत पीक शेतात बहरलेले आहे. रविवारी मेडशी वनपरिक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी शेतात शिरल्याने तीन एकरावरील पीक जमिनीसह खरडून गेले आहे. याबाबत माहिती मिळताच तलाठी एम. एन. पठाण यांनी नुकसानाचा सर्व्हे सोमवारी केला असून, अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. (फोटो)
------------------
नाल्याचे रुंदीकरण करा; गतवर्षीही जमीन खरडली
शेतकरी विजय हिरामण राठोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची गतवर्षी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने पिकासह शेती वाहून गेली होती. त्यामुळे शेताला संरक्षण म्हणून आणि नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम शेतकरी विजय हिरामण राठोड यांनी स्वखर्चाने केले होते, मात्र रविवारी मध्यरात्री आलेल्या पावसामुळे पाणी शेतात शिरले आहे. दरवर्षी हीच समस्या असल्याने शासनाने कायमस्वरूपी उपाय योजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
230821\1956img-20210823-wa0270.jpg
शेती खरडून गेली