अकोला: जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.
उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला वापर आणि पारंपरिक पिके घेण्याच्या पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यानुषंगाने पीक पद्धतीत सुधारणा करून जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढावा या दृष्टीने शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. शेतकरी बचतगटांकडून तयार करण्यात आलेली सेंद्रिय खते शेतीमध्ये वापरासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यास मदत होणार आहे.
असे तयार करणार सेंद्रिय खते!
शेतातील काडीकचरा, शेणखत, माती आणि पालापाचोळा कुजवणारे जिवाणू इत्यादी घटकांचा वापर करून शेतकरी बचतगटांकडून सेंद्रिय खते करण्यात येणार आहेत.
जमिनीची ढासळती सुपीकता सुधारण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून सेंद्रिय खते तयार करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
- शंकर तोटावार, प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.