अकोला : राज्यातील शेतकर्यांनी खासगी बाजारात आतापर्यंत ५२ लाख क्विंटलवर कापूस विकला असून, पणन महासंघाकडे ७४ हजार ८९५, तर भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) नुकत्याच सुरू केलेल्या २६ कापूस खरेदी केंद्रांवर ७१ हजार ५५७ क्विंटल कापूस खरेदी केला आहे. मागील वर्षी सीसीआयने देशभरात ३३५ व महाराष्ट्रात ७0 कापूस खरेदी केंद्रे सुरू केली होती. त्याद्वारे ८६.९0 लाख क्विंटल कापूस खरेदी केला होता. पणन महासंघाने ११५ खरेदी केंद्रे सुरू केली होती. यावर्षी सीसीआयने खरेदी केंद्रे सुरू करण्यास विलंब केला असून, आतापर्यंत केवळ २६ खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने ७0 कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. कापूस उत्पादक क्षेत्र आणि सीसीआय व पणन महासंघाची खरेदी केंद्रे अपुरी पडत आहेत. तथापि, सीसीआय स्वत: केंद्र उघडत नसून, आम्हालाही परवानगी देत नसल्याचा आरोप पणन महासंघाच्या वरिष्ठांनी केला आहे. दरम्यान, कापसाचे हमी दर प्रति क्विंटल ४१00 रुपये असले तरी प्रतवारीचे निकष लावून खरेदी केली जात असल्याने शेतकर्यांना प्रत्यक्षात ३९00 ते ३९५0 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. राज्यात अनेक तालुक्यांमध्ये अद्याप पणन महासंघ व सीसीआयची खरेदी केंद्रे सुरू झाली नसल्याने शेतकर्यांचा कापूस खेडा पद्धतीने खरेदी केला जात आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात कापसाला बोनस किंवा सामाजिक सुरक्षितता म्हणून दरवाढीची घोषणा होईल, यासाठी अनेक शेतकर्यांनी कापूस अद्याप विकलेला नाही. सामाजिक सुरक्षितता म्हणून कापूस उत्पादक शेतकर्यांची दखल घेतली जाईल का, याकरिता श्ेतकर्यांचे लक्ष विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाकडे लागले आहे. मागील वर्षी ११५ कापूस खरेदी केंद्रे सुरू केली होती. यावर्षी आमची तेवढीच केंद्रे सुरू करण्याची तयारी आहे. सीसीआयचे आम्ही अभिकर्ता असल्याने त्यासाठीची परवानगी हवी असल्याचे महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी यांनी स्पष्ट केले.
खासगी बाजारात शेतक-यांनी विकला ५२ लाख क्विंटल कापूस
By admin | Published: November 28, 2015 2:19 AM