अकोला : आता पारंपरिक पेऱ्यात बदल करून हळद लागवड करण्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल आहे. कपाशी, सोयाबीन पेरणारा शेतकरी हळदीकडे वळत आहे. जिल्ह्यात २८६ हेक्टर क्षेत्रात हळदीची लागवड झाली आहे.जिल्ह्यात दरवर्षी सरासरी २०० हेक्टरवर हळदीची लागवड होते. दोन वर्षांपूर्वी पावसाने दडी मारल्याने त्याचा परिणाम हळद लागवडीवर झाला होता. त्यामुळे हळदीचे क्षेत्र कमी झाले होते.
नापिकी व कर्जबाजारीपणाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा खरीप हंगाम सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरत आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाने पुन्हा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे; परंतु यंदा सर्वत्र मान्सून पाऊस वेळेत सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना हळद लागवडीचे नियोजन करून लागवड देखील केली आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात २२० हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. यंदा २८६ हेक्टरवर लागवड झाली आहे.
कोरोना काळात हळदीला चांगले दर
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हळद आरोग्यास उपयुक्त असल्याने हळदीच्या मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे हळदीचे दर सुरुवातीपासूनच अपेक्षित मिळाले. वास्तविक पाहता, गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळदीला प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपयांनी अधिक दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
बाजारपेठ न मिळाल्याने अडचण
यंदाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांना हळद विक्रीस अडचणी निर्माण झाल्या; मात्र दोन महिन्याच्या कालावधीनंतर बाजार सुरू झाले तरी दराला झळाळी होती; मात्र जिल्ह्यात हळद विक्रीची बाजारपेठ उपलब्ध नसल्याने परजिल्ह्यात जाऊन हळद विक्री करावी लागत आहे.
तालुकानिहाय हळद लागवड
तालुका क्षेत्र (हेक्टर)
अकोला ३८.७०
बार्शीटाकळी ६०.००
मूर्तिजापूर २३.००
अकोट १००.००
तेल्हारा १५.००
बाळापूर ५.००
पातूर ४५.००
हळद उत्पादक म्हणतात...
पारंपरिक पिकांपेक्षा दुसरे पीक म्हणून हळद लागवड केली आहे. सध्या एका एकरात लागवड केली असून औषधी वनस्पतीकडे वळण्याचा विचार आहे.
- योगेश तिडके, शेतकरी, पातूर
सोयाबीन, कपाशीपेक्षा हळद पिकावर रोगराई येत नाही. उत्पन्नही चांगले आहे. हळदीला दरही चांगला मिळत आहे. यावर्षी चार एकर लागवड केली आहे.
- मदनसिंह नेरविय्या, शेतकरी, बाळापूर