आकोट: येत्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड करताना घरच्या घरी बियाण्यांची उगवणशक्ती तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन आकोट कृषी विभागाने केले आहे. तालुक्यातील देवरी येथे आयोजित खरीपपूर्व ग्रामसभेत शेकडो शेतकर्यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षस्थानी हरिभाऊ वाघोडे, तर प्रमुख अतिथी पंकज फोकमारे होते. उपविभागीय कृषी अधिकारी अशोक गायकवाड, ताकृअ अशोक माळी, मंडळ कृषी अधिकारी अशोक चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी शेतकर्यांना खरीप हंगाम पेरणीपूर्व मार्गदर्शन करण्यात आले. ७० टक्के उगवणशक्ती आली तरच एकरी ३० किलो बियाणे टाकावे, ५० टक्क्यापर्यंतउगणवशक्ती निघाली तर ४० किलो बियाणे वापरावे, असा सल्ला कृषी अधिकार्यांनी दिला. सोबतच सोयाबीनच्या शेतात आंतर पिकाचे प्रमाण वाढवावे, बीबीएफ पद्धतीने उताराला आडवी पेरणी करावी, जेणेकरून कमी पावसात पिकांना ओलाव्याचा फायदा होईल. तीन से.मी. पेक्षा खोल पेरणी करू नये. यावेळी उगवणशक्ती कशी तपासावी,याचे सर्व शेतकरी बांधवांसमोर प्रात्यक्षिक करून दाखविले. उगवणशक्ती तीन प्रकारे तपासण्यात येते. वर्तमानपत्र थोडेसे ओले करून त्यावर १०-१० बिया ठेवाव्यात. त्याची गुंडाळी करून प्लास्टिकच्या पिशवीत थंडाव्याच्या ठिकाणी ठेवावे, तसेच गोणपाट ओले करून त्यामध्ये बिया ठेवाव्यात किंवा कुंडीत १०० बिया पेराव्या. ६ ते ७ दिवसात बियाण्याला अंकुर आलेले दिसतील. या प्रसंगी कृषी सहाय्यक करवते, वासुदेव भोई, सुनील राजनकर, कुमावत, सांगोळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. संपूर्ण तालुक्यात गावोगावी उगवणक्षमता तपासणी अभियान राबविल्या जात आहे. शेतकरी बांधवांनी या अभियानाच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
शेतकर्यांनी सोयाबीन बियाण्यांची क्षमता तपासावी
By admin | Published: May 28, 2014 9:49 PM