मूर्तिजापूर (जि. अकोला) : शेतकर्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलता कार्य करीत राहावे, असे आवाहन परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी रविवारी केले. तंत्रज्ञानाचा उपयोग ग्रामविकासासाठी होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. तालुक्यातील मुरंबा येथे दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळातर्फे वाढदिवसानिमित्त कार्यगौरव व विज्ञानसंत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. भटकर म्हणाले की, भारतीय संस्कृती, अध्यात्म, योग यांमधून विकासाची पायाभरणी शक्य आहे. देशाला आता नवीन विचारांची गरज आहे. नवीन विचार देशाला बदलवू शकतात. एकविसावे शतक हे भारताचे असेल. ह्यहम बदलेंगे, दुनिया बदलेगीह्ण हेच मनात ठाम रुजवावे, असेही ते म्हणाले. व्यासपीठावर खासदार संजय धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, गजानन पुंडकर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डब्ल्यू. झेड. गंधारे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, जी. आर. ठाकरे, श्री गाडगे महाराज मिशनचे उपाध्यक्ष उत्तमराव ऊर्फ बापू देशमुख, सुहासिनी धोत्रे, एस. एन. शिंगाडे, नरेशचंद्र काठोळे, प्राचार्य दीपक शिरभाते, प्राचार्य संजय खेर्डे, पंचायत समिती सभापती शुभांगी खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी इंदुमती गिते, कुलगुरू डॉ. दाणी, बापू देशमुख, सुहासिनी धोत्रे, खासदार संजय धोत्रे, आमदार हरीश पिंपळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. गजानन भारसाकळे यांनी केले.
शेतक-यांनी आत्महत्या न करता कार्य करीत राहावे
By admin | Published: October 14, 2015 1:24 AM